डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या अपहरणातील सात जण अटकेत | पुढारी

डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या अपहरणातील सात जण अटकेत

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : वडाळा येथील डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी यांचे अपहरण करून त्यांना गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 1 कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यांच्याकडील 5 लाख 88 हजार 420 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेणार्‍या 7 आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेली रक्कम, एक इनोव्हा कार, एक मोटारसायकल, 7 मोबाईल, असा 8 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

विकास सुभाष बनसोडे (वय 31), सिध्दार्थ उत्तम सोनवणे (वय 42, दोघे रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे), रोहित राजू वैराळ (वय 28, रा. वडगाव बुद्रुक, भवानीनगर, पुणे, सध्या रा. आंबेगाव, पुणे), रामचंद्र बालाजी कांबळे (वय 28, रा. ता. हवेली, जि. पुणे), वैभव प्रवीण कांबळे (वय 21, रा. जवळा खुर्द, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), भारत दत्तात्रय गायकवाड (वय 31), मुराद हनीफ शेख (वय 31, दोघे रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पोलिसांनी कोर्टापुढे उभे केले असता सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

तालुका उत्तर सोलापूर येथील वडाळा येथे राहणारे डॉ. अनिल व्यंकटेश कुलकर्णी (सध्या रा. उत्तर कसबा, सोलापूर) यांचे वडाळा येथे मोठे हॉस्पिटल व पेट्रोल पंप आहे. 21 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास तेे एमएच 13 बीएन 9367 या कारमधून वडाळ्याकडून सोलापूरकडे जात होते. बीबीदारफळ ते कोंडी रस्त्याने एमआयडीसी क्रॉसरोडवर आले असताना दरोडेखोरांनी इनोव्हा कार आडवी लावून डॉ. कुलकर्णी यांना गाडीतून उतरवून इनोव्हामध्ये बसविले. त्यांना गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कोयत्याने वार केले. काठीने व हॉकी स्टीकने मारहाण केली व 1 कोटीची खंडणी मागितली. डॉक्टरांनी पैसे नाहीत असे म्हटल्यावर डॉक्टरांजवळील 5 लाख 88 हजार 420 रूपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना वारजे, मळेवाडी, पुणे येथे गाडीतून खाली ढकलून दिले. याप्रकरणी डॉ. अनिल कुलकर्णी यांनी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांच्या पथकाला सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेस हा गुन्हा वडगाव, सिंहगड रोड, पानमळा, पुणे येथील गुन्हेगारांनी केल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी 5 आरोपींना पुणे येथून अटक केली. दोन आरोपींना वडाळा येथून अटक केली.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी पार पाडली.

वडाळ्यातील मुलाने दिली डॉक्टराची टीप

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून 5 आरोपींना अटक केली. त्यापैकी एकाचा भाचा वडाळ्यात राहतो. त्यानेच डॉ. अनिल कुलकर्णी यांची टीप दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी डॉक्टराचे अपहरण केले. एक कोटींची खंडणी मागितली आणि 6 लाख रुपये लुटले होते.

Back to top button