Vedaant Madhavan: आर. माधवनचा मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी जिंकली ७ पदके! | पुढारी

Vedaant Madhavan: आर. माधवनचा मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी जिंकली ७ पदके!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत (Vedaant Madhavan) हा भारतीय जलतरणपटू आहे. त्याने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून अनेक पदके व पारितोषिके जिंकली आहेत. बेंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या ४७ व्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिप २०२१ मध्ये १६ वर्षीय वेदांतने आता सात पदके जिंकली आहेत. स्पर्धेत त्याने चार रौप्य आणि तीन कांस्यपदके आपल्या नावावर केली..

वेदांतने (Vedaant Madhavan) स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. वेदांतने ८०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, ४×१०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीलेमध्ये कांस्य पदक. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये त्याला रौप्य पदक मिळालं आहे.वेदांतच्या या यशावर त्याचे वडील आर. माधवन खूश आहेत. सोशल मीडियावरही नेटकरी ट्वीट करत वेदांतचे अभिनंदन करत आहेत.

वेदांत माधवनच्या यशावरून आर्यन खान ट्रोल…

सध्या देशात अभिनेता शाहरुख याचा मुलगा आर्यन खानचे ड्रग्स प्रकरण चर्चेत आहे. तर त्याचवेळी साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडचा अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत याने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. १६ वर्षीय मुलगा वेदांत माधवनने (Vedaant Madhavan) वडिलांना गर्व वाटावा असे काम केल्याने सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर त्याची आणि ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या शाहरुख पुत्र आर्यन खान याच्याशी तुलना होत आहे. एकीकडे यूजर्स वेदांत आणि आर माधवनचे कौतुक करताना थकत नाहीत, तर दुसरीकडे शाहरुखचा मुलगा आर्यन खान तुरुंगात आहे. युजर्स दोघांवरच्या संस्कारांची तुलना करत आहेत. एक देशासाठी पदक जिंकत आहे आणि दुसरा नशेच्या गर्तेत अडकला आहे, अशी फिरकी नेटकरी घेत आहेत.

माधवन सध्या रॉकेट्री : द नंबी इफेक्ट या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून चित्रपटाची पटकथा त्याचीच आहे. हा बायोपिक भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मधील माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. नंबी यांची भूमिका साकारणाऱ्या माधवन व्यतिरिक्त, चित्रपटात सिमरन आणि रवी राघवेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीत अभिनेता सुर्याही एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

Back to top button