आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे म्हणाले, महाविद्यालयांमध्येच होणार लसीकरण | पुढारी

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे म्हणाले, महाविद्यालयांमध्येच होणार लसीकरण

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालये सुरू होत असल्याने युवकांचे लसीकरण झपाट्याने पूर्ण होण्यासाठी आता महाविद्यालयांमध्येच लसीकरण शिबिरे घेतली जाणार आहेत. तसेच राज्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने मिशन कवच कुंडलला दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मंगळवारी येथे केली.

राज्यातील 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे मोठे आव्हान असल्याने शिक्षण विभागाशी चर्चा करून महाविद्यालयांमध्ये लसीकरणाची शिबिरे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत साडेनऊ कोटी नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. उर्वरित अडीच कोटी जणांनाही लवकरच डोस दिले जातील.

केंद्र शासनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्राने लसीकरणात चांगली कामगिरी केली आहे. अवकाळी पाऊस आणि शेतीची लांबलेली कामे यामुळे लसीकरण थंडावले होते. त्यामुळे दिवाळीपर्यंत कवच कुंडल मोहीम सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांची सेवा यापुढे वाढवली जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ दिली होती. यानंतर 60 वर्षे हेच सेवानिवृत्तीचे वय असेल, असेही आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान आरोग्य विभागाच्या भरतीप्रक्रियेत कोणताही गोंधळ नसून, नियमानुसारच काम सुरू असल्याचा दावा ना. टोपे यांनी केला.

दिवाळीनंतर सौम्य लाटेची शक्यता

दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची सौम्य लाट येऊ शकते. लसीकरण पूर्ण क्षमतेने झाल्यास या लाटेची तीव्रता फार नसेल. राज्यात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत 85 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईत एकही मृत्यू न होणे ही मोठी बाब आहे. अर्थचक्र गतिमान होण्यासाठीच महाराष्ट्र अन्लॉक करण्यात येत आहे.

सरकारने लोकांच्या जीविताचा प्राधान्याने विचार केला. लहान मुलांसाठी लसी उपलब्ध झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. सूचना प्राप्त झाल्यावर राज्य सरकार त्यासंदर्भात काम करण्यास सज्ज आहे, असेही ना. टोपे यांनी सांगितले.

Back to top button