आर्यन खान सह मित्रांना ७ पर्यंत कोठडी | पुढारी

आर्यन खान सह मित्रांना ७ पर्यंत कोठडी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉर्डेलिया क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीप्रकरणी राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांच्या कोठडीमध्ये न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. तर, अन्य पाच आरोपींनाही न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

एनसीबीने ड्रग्ज पार्टीचा पुरता बेरंग केला असला तरी हे प्रकरण आता खरे रंगात आलेले दिसते. सोमवारी कॉर्डेलिया क्रूझ पुन्हा मुुंबईला येताच तिच्यावर छापा टाकत एनसीबीने आणखी आठ जणांना अटक केली आणि ड्रग्ज जप्‍त केल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी देशाच्या विविध भागांत छापे टाकण्यात येत आहेत.

एनसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. या आरोपींजवळून 21 ग्रॅम चरस, 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, एमडीएमच्या 22 गोळ्या आणि 1 लाख 33 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करून एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना अटक केली.

एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना रविवारी सायंकाळी सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपत असल्याने एनसीबीने सोमवारी दुपारी त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले.

आर्यन खान गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज सेवन करतो. त्याच्या मोबाईलमधील चॅटमधून काही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी करत ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठीच आर्यनसह अन्य दोन आरोपींची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली गेली.

आरोपींच्या वकिलांनी एनसीबीच्या वाढीव कोठडीला जोरदार विरोध केला. आर्यन याला पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. आर्यन याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो नेहमी तपास यंत्रणेला सहकार्य करेल. पळून जाणार नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. न्यायालयात दोन्ही पक्षांचा तब्बल दोन तासांहून अधीक काळ युक्तिवाद रंगला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एनसीबीची मागणी मान्य करत तिन्ही आरोपींच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने रविवारी सायंकाळी नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर आणि गोमित चोप्रा यांना अटक केली होती. या पाचही जणांना एनसीबीने सोमवारी न्यायालयासमोर हजर केले. एनसीबीने या पाचही आरोपींना 9 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने या आरोपींनाही 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली.

Back to top button