अकलेचा वापर केलेल्यांकडेच जिल्हा बँकेची सत्ता : नारायण राणेंची महाविकास आघाडीवर टीका | पुढारी

अकलेचा वापर केलेल्यांकडेच जिल्हा बँकेची सत्ता : नारायण राणेंची महाविकास आघाडीवर टीका

कणकवली; पुढारी ऑनलाईन : इतकी वर्षे सर्वांना पुरुन उरलोय. तीन पक्ष एकत्र असतानाही पराभूत झाले. विजयासाठी अकलेचा वापर झाला. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.

लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सिद्धीविनायक सहकार पॅनेलने ११ जागावर विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व मिळविले. तर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सहकार वैभव पॅनलला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजप पॅनलचे प्रमुख राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीतील विजयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

आता महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे लक्ष आहे. राज्याची अधोगतीकडे वाटचाल सुरु आहे. यांची लायकी पोस्टर लावण्याची आहे, अशा शब्दांत राणेंनी राज्य सरकावर टीका केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नितेश राणे यांना अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली. हे कशाचे लक्षण आहे. जिल्हा बँकेसाठी तीन पक्षांसह अर्थमंत्रीही कामाला लागले. आम्हाला कोकणातील देवदेवता आणि लोकांनी कौल दिला. आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे आमचे लक्ष लागले आहे, असेही ते म्हणाले.

राजन तेली यांच्या पराभवावर बोलताना ते म्हणाले, राजन तेली यांचा राजीनामा ही छोटी गोष्ट आहे. आम्ही कुठेही त्यांचे पुनर्वसन करू. आमच्या पक्षाची खालून वरपर्यंत सत्ता आहे. त्यामुळे त्यांना कुठेही संधी मिळेल.’

हेही वाचा : 

Back to top button