sawantvadi crime : सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा धारदार शस्त्राने खून | पुढारी

sawantvadi crime : सावंतवाडीत दोन वृद्ध महिलांचा धारदार शस्त्राने खून

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी उभाबाजार परिसरात असलेल्या एका जुन्या घरात दोन वृध्दांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. या घटनेने आज (दि.३१) सावंतवाडी शहर चांगलेच हादरले. ती धारदार वस्तू कोणती तसेच हा खून कोणी केला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान सकाळीच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. (sawantvadi crime)

नीलिमा नारायण खानविलकर (वय ८०) व शालिनी शांताराम सावंत (वय ७५) असे खून झालेल्‍या महिलांचे नाव असून, शालिनी या खानविलकर यांच्याकडे केअरटेकर म्हणून काम करत होत्या.

sawantvadi crime : प्रॉपर्टीच्या कारणावरून खून झाल्याचा संशय

याबाबतची अधिक माहिती माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली. ते म्हणाले, या ठिकाणी असलेल्या खानविलकर या माझ्या जवळच्या नातेवाईक आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे आलाे हाेता.  हाका मारल्या पण कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे मी थेट घरात गेलो. त्यावेळी त्या दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. या घटनेची माहिती मी सावंतवाडी पोलीस ठाण्याला फोन करून दिली. हा प्रकार अज्ञात चोरट्याकडून झाला असावा, असे प्रथम दर्शनी बोलले गेले; परंतु त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चैन होत्या. त्यामुळे दागिन्यांच्या चोरीसाठी हा खून झालेला नाही मात्र प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाला असावा, असा अंदाज असल्याचे मसुरकर म्हणाले. याबाबतची माहिती त्यांच्या भाच्याला देण्यात आली आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल

पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहा पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली.  खून कोणत्या कारणावरून झाला याबाबत तपास करण्यात येणार आहे. तपासासाठी श्वान पथक घटनास्थळी दाखल होणार आहे. दुहेरी खुनाने सावंतवाडी शहर हादरले आहे.

हेही वाचलं का?

Back to top button