आजपासून महाविद्यालये गजबजणार | पुढारी

आजपासून महाविद्यालये गजबजणार

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात कोरोना रुग्ण घटल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. आता शासनाने वरिष्ठ महाविद्यालये दि. 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यातील 56 महाविद्यालये बुधवारपासून सुरू होणार आहेत.

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील नियमित वर्ग 20 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती, त्याची अंमलबजावणी बुधवारपासून होत आहे. कॉलेज सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वरिष्ठ महाविद्यालय सुरू करताना, शासन आदेशाचे पालन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी बैठकीबाबत योग्य नियोजन करण्यात येणार आहे. दररोज विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सीजन मात्रा तपासली जाणार असून सॅनिटायझर देवूनच प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 56 महाविद्यालयांच्या 21 हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अध्यापन सुरू होते. मात्र, बुधवारपासून प्रत्यक्ष महाविद्यालयातील वर्गात बसून अध्यापन करता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी बेंचेस, वर्गखोल्या व इमारत, परिसराचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे. अठरा वर्षांपुढच्या विद्यार्थ्यांना लसीकरण सक्तीचे आहे. काही महाविद्यालयांनी महाविद्यालयात लसीकरण शिबीर आयोजित करून लसीकरण पूर्ण करून घेतले आहे.

काही वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालये असल्याने कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले आहेत. वर्ग सुरू करण्यापूर्वीच निजंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. याच महिन्यात महाविद्यालयाच्या सहामाई परीक्षा सुरू होणार असून, दि. 30 ऑक्टोबरपर्यत शैक्षणिक कामकाज चालणार आहे. दि.1 नोव्हेंबरपासून दीपावलीची सुट्टी महाविद्यालयांना मिळणार आहे. त्यामुळे जेमतेम दहा दिवसच महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज चालणार आहे.

वसतिगृहे टप्प्याटप्याने सुरू होणार

लस न घेतलेल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. वर्ग 50 टक्के

क्षमतेने सुरू करावे, याबाबत स्थानिक प्राधिकरणांकडून सल्ला घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात उपस्थित राहून शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सुविधा दिली जाईल. वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत. दोन डोस घेतलेल्या अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना लोकल पास देण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

Back to top button