सिंधुदूर्ग : नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार? | पुढारी

सिंधुदूर्ग : नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार?

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परुळे येथील सिंधुदूर्ग विमानतळ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न होत आहे.

हा लोकार्पण सोहळा जाहीर कार्यक्रम नसून केवळ निमंत्रितांसाठी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय लघु सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. ना. ठाकरे आणि ना. राणे ही दोन्ही प्रमुख नेतेमंडळी एकत्र येणार असल्याचे ते काय बोलणार? याकडे लक्ष त्याकडे लागलेले आहे.

सिंधुदूर्ग विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग विमानतळावर प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी लोकार्पण सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था कशी राहणार? कार्यक्रम कुठे होणार? याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हामुख्य कार्यकारी अधिकारी प्रजत नायर, एमआयडीसी व आयआरबी कंपनीचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत परिपूर्ण आढावा घेतला.

दरम्यान, एअर अलायन्स कंपनीने ७० सीटर विमानाचे बुकिंगसुद्धा ऑनलाईन सुरू केले आहे. सध्या तरी दिवसातून एकच विमान सिंधुदूर्ग ते मुंबई, मुबंई ते सिंधुदूर्ग असा प्रवास करणार आहे. एकूणच २० वर्षानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, त्या सोहळ्याकडे तमाम जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button