शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकातला किडा होऊ नका : पुरुषोत्तम बेर्डे | पुढारी

शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकातला किडा होऊ नका : पुरुषोत्तम बेर्डे

खेड(रत्‍नागिरी), पुढारी वृत्‍तसेवा : शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकातला किडा होऊ नका. नवीन कोणता तरी मार्ग त्यातून तुम्ही शोधून काढा, असा सल्ला लेखक, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, नाट्यकर्मी, नेपथ्यकार, व्यंगचित्रकार, पुरूषोत्तम बेर्डे यांनी दिला. येथील आयसीएस महाविद्यालयात सोमवार दि.२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित आठ दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना बेर्डे म्हणाले, एकेकाळी कोकण हा आपल्या शेतकऱ्यांचा प्रदेश परंतु हळूहळू शिक्षण क्षेत्र विकसित होत आहे. पूर्वी शिक्षण घेण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावं लागत होतं. त्याशिवाय पर्याय नव्हता परंतु आता या ठिकाणी विविध संस्थांमार्फत दर्जेदार शिक्षण मिळत आहे. या शिक्षण संस्थेने या ठिकाणी आयोजित केलेल्या या वर्कशॉपचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अशा प्रकारच्याच वर्कशॉपमधून अनेक मोठ्या व्यक्तींनी आपली करिअर घडवलेली आहेत. त्यामुळे या वर्कशॉपला गांभीर्याने घेऊन त्यातून आपल्याला करिअरची दिशा मिळवायचे आहे. या वर्कशॉप मधील विद्यार्थी म्हणून अनुभव टिपून घेतला पाहिजे. जे वक्ते या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यांच्याकडून मुद्दे घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने काहीतरी वेगळं घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकातला किडा होऊ नका. नवीन कोणता तरी मार्ग त्यातून तुम्ही शोधून काढा. मी स्वतः मुंबईच्या अतिशय मागासलेल्या विभागातून लहानाचा मोठा झालो. त्या परिस्थितीत जे मला संस्कार मिळाले तेथून मी पुढे चित्रकलेचा विशेष अभ्यास केला आणि त्याच माध्यमातून माझ्या अंगातल्या कलांचा विकास माझ्या प्राध्यापकांनी शिक्षकांनी मला दाखवून देत घडवला. त्यातूनच माझे ४५ ते ५० वर्षाची कारकीर्द समृद्ध झाले आहे.

या वर्षाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला ओळखायला शिका. कारण तुम्ही भविष्यात काय करायचं आहे हे ठरवण्याची तुमची हेच वेळ आहे. आरशात ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःचे प्रतिबिंब बघता त्याचप्रमाणे अशा वर्कशॉपमध्ये तुम्ही स्वतःला पडताळून पहा आणि तुमची स्वतःची प्रतिबिंब राहून शिक्षणातले पैलू जाणून घेणे आवश्यक आहे. आपण नक्की कुठे जात आहोत आपण बुडतोय की तरतोय हे आपण पडताळून पहा. त्यामुळे या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या वर्कशॉपला गांभीर्याने घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन खेड व परिसराचा नाव लौकिक वाढवावा यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो, असे ते म्हणाले.

.हेही वाचा 

कोल्हापूर : मुदाळतिट्टा येथे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

गडचिरोली : ‘उमेद’च्या प्रक्रिया उद्योगाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

पुणे : ज्वारी, बाजरी, गहू, मूगडाळ, पोहे, शेंगदाणा दरात मोठी वाढ

Back to top button