चिपळूण: लोकांच्या पोटात भीतीचा गोळा | पुढारी

चिपळूण: लोकांच्या पोटात भीतीचा गोळा

चिपळूण;पुढारी वृत्तसेवा: गेले दोन दिवस सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चिपळुणातून वाहणारी वाशिष्ठी आणि शिव नदी इशारा पातळीजवळ पोहोचली आहे. आज (बुधवारी) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तर नव्या बाजार पुलाला वाशिष्ठीचे पाणी लागले व येथील मच्छी मार्केटमध्ये देखील ते शिरले. यामुळे शासकीय व नगरपरिषद यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीचा धोका लक्षात ठेवून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, कोयना वीज प्रकल्पातील टप्पा-1, 2 व 4 मधून होणारी वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे तर वाशिष्ठी आणि शिव नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे खेड गतवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चिपळुणात महापुराचे हाहाकार उडविला. तिथीप्रमाणे या घटनेला वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे अनेकांच्या महापुराच्या आठवणी जाग्या झाल्या. मंगळवारी रात्रभर पाऊस पडल्याने वाशिष्ठी आणि शिव नदी दुथडी भरून वाहू लागली तर बुधवारी दुपारी 12 वा. भरती असल्याने दोन वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठीने आपले पात्र सोडले आणि नव्या बाजार पुलाला वाशिष्ठीचे पाणी लागले.

याशिवाय लगतच्या रस्त्यावर पाणी आले. यामुळे शासकीय यंत्रणेत हालचाल सुरू झाली. खेर्डी, बहादूरशेख पूल, शिव नदी अशा सर्वच ठिकाणी या हंगामातील पाणी पातळी वाढली. 4.20 मी. पेक्षा अधिक पाणी पातळी झाली. या पार्श्‍वभूमीवर शासकीय यंत्रणेने संबंधित ठिकाणी तत्काळ भेटी दिल्या. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, प्रांताधिकारी प्रवीण पवार, न.प.चे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे आदी अधिकार्‍यांनी प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन पाणी पातळीचा अंदाज घेतला व नदी किनार्‍यालगतच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. रात्री 12 वा. पुन्हा भरती असल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून एनडीआरएफला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या चोवीस तासात शंभर मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे तर यावर्षी पावसाने गतवर्षीची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे आता चिपळूणवासीयांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. मात्र, वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढल्याने चिपळूणमध्ये महापुराच्या संकटावर परिणाम झाला आहे. नदीची पाणी वहन क्षमता काहीअंशी वाढल्याने यावर्षी पहिल्यांदाच वाशिष्ठी नदीने पात्र सोडले आहे. त्यामुळे खेर्डी, चिपळूणमधील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र, दुपारनंतर पावसाने घेतलेली उसंत व ओहोटी यामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणी पातळीत काहीअंशी घट झाली.

मात्र, रात्रीच्यावेळी प्रशासन अलर्ट मोडवर असणार आहे. तालुक्यात अतिवृष्टीने ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. मुंढेतर्फे चिपळूण येथे श्रीपत भिकू खेतले यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. कापसाळ सुर्वेवाडी येथे विजय गोरे यांच्या घरामागील संरक्षक भिंत कोसळली. मौजे कापसाळ येथील सोनारवाडी, पायरवाडी, गायकरवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे कठडे कोसळले आहेत. विष्णू धनाजी कदम, गणपत रामा बंगाल (आकले) यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले तर जयश्री रघुनाथ कोतवडेकर यांच्या घराचे छप्पर पडून नुकसान झाले आहे.

कोयना नदीत विसर्ग…

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टी होत असल्याने कोयना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सद्यस्थितीत कोयना धरणात 38.48 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 36 टक्के भरले आहे. कोयना येथे 123 मि.मी., नवजामध्ये 142 तर महाबळेश्‍वर येथे 136 मि.मी. पावसाची नोंद झाली असून पाण्याची आवक वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोयना धरणातून 13 रोजी सायंकाळी 5 वा. 1050 क्यूसेक पाणी कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, हे पाणी कोयना नदीतून सांगली आणि त्यानंतर पुढे अलमट्टीला जाऊन मिळते. त्यामुळे या विसर्गाचा चिपळूणशी संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Back to top button