कणकवली: पालकमंत्री कोण, मंत्रिपद कुणाला हे शिंदे-फडणवीसच ठरवतील | पुढारी

कणकवली: पालकमंत्री कोण, मंत्रिपद कुणाला हे शिंदे-फडणवीसच ठरवतील

कणकवली;पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांचे सरकार सत्‍तेत आले आहे. आमच्यात पक्‍की दिलजमाई झाली आहे. जिल्हयात पालकमंत्री कोण होणार? मंत्रिपद कोणाला मिळणार? हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच ठरवतील. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार असल्याने आता राज्यासह कोकणच्या विकासाला गती मिळेल. महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारच्या अनेक विकास कामात अडथळे निर्माण झाले होते. आता मात्र अधिक वेगाने विकास होईल असा विश्‍वास भाजप नेते आणि भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आशिष शेलार यांनी कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला.

आ.शेलार हे मंगळवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आले होते. कणकवली प्रहार भवनात त्यांनी भाजपच्या जिल्हयातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आ. नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते प्रमोद जठार, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत उपस्थित होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभाचे प्रभारी म्हणून नियुक्‍ती केली आहे. त्या दृष्टीने आपण आढावा घेतला. आम्ही जिंकण्यासाठी या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

राज्यात स्थापन झालेले शिंदे गट आणि भाजप सरकार लवकरच कोसळेल असे भाकीत शरद पवार यांनी केले आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आशिष शेलार यांनी शरद पवार हे मोठे नेते आहेत. मात्र ते बोलतात तसे होत नाही. ते प्रत्यक्षात बोलतात एक आणि घडते वेगळेच.असा टोला शेलार यांनी लगावला. 11 जुलैपर्यंत आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याने मंत्रीमंडळाच्या विस्तारास विलंब होत आहे का? या प्रश्‍नाबाबत बोलताना त्याचा आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काही संबंध नाही. लवकरच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार करतील असे शेलार म्हणाले. आ. नितेश राणे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल का? या प्रश्‍नाबाबत बोलताना आशिष शेलार यांनी त्याचेही उत्‍तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देऊ शकतील. त्यांचे वडील नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मोदी, शहा आणि नड्डा यांच्याशी त्यांचा संपर्क असतो त्यामुळे त्यांनाच अधिक माहिती असेल, असे शेलार म्हणाले.

Back to top button