सिंधुदुर्ग : मांगेली धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी (Video) | पुढारी

सिंधुदुर्ग : मांगेली धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी (Video)

दोडामार्ग ; रत्नदीप गवस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, दोडामार्ग तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मांगेली (फणसवाडी) येथील धबधबा रविवारी पर्यटकांनी गजबजुन गेला. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षे पर्यटनाला ब्रेक लागल्याने या वर्षीचा पर्यटनाचा हंगाम सुरूवातीलाच हाऊसफुल्ल झालेला पहावयास मिळत हाेता.

मांगेली येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, बेळगांव, येथून वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात. या परिसरात रिमझिम बरसणारा थंडगार पाऊस, दाट धुके, मनमोहक निसर्ग सौंदर्य, दूरवर दिसणारा तिलारी धरणाचा विस्तीर्ण जलाशय अशा अनेक गोष्टींमुळे पर्यटकांची पाऊले येथे वळली आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो, त्यात पावसाळ्यात या सर्व गोष्टी पर्यटकांना एकत्रित अनुभवता येत असल्याने मांगेलीत बहुसंख्येने पर्यटक दाखल होतात.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे वर्षा पर्यटनाला ब्रेक लागला होता. या वर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने वर्षा पर्यटनाला प्रचंड गर्दी हाेईल, हे निश्चीत होते; पण जून महिन्यात पाऊस लांबल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. आता गेले काही दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. रविवारी 3 जुलै या दिवशी बहुसंख्येने पर्यटक पर्यटनाला आले होते. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली होती.

पर्यटकांच्या गाड्या अधिक झाल्याने वाहनतळ देखील कमी पडला होता. ग्रामस्थांच्या वतीने या तळाची व्यवस्था पाहण्यात येत होती. धबधब्या पर्यत जाणारा रस्ता बीबीएम करून अर्धवट ठेवल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. स्थानिकांनी अनेक ठिकाणी छोटी-छोटी हॉटेल उभारली असुन पर्यटकांच्या मागणी नुसार या ठिकाणी खाद्य पदार्थ देण्यात येत आहेत.

घाट पायऱ्या होणे आवश्यक : पर्यटक

मांगेली येथील धबधबा डोंगराच्या माथ्यावरून खाली कोसळतो. इथ पर्यंत पर्यटक उंचावरून पडणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात; पण पायथ्याच्या ठिकाणा पर्यत जाताना अवघड पायवाट असल्याने आणि मोठ मोठे दगड असल्याने पर्यटकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे घाट पायऱ्या होणे आवश्यक आहेत, अशी मागणी आलेले पर्यटक करीत आहेत.

महिलांसाठी चेंजिंग रूम आवश्यक…

पर्यटकांमध्ये महिलांचा समावेश अधिक असतो. त्‍यामुळे धबधब्‍याच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजीग रूम नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रा. पं. आणि ग्रामस्थ यांनी याबाबत पुढाकार घेत महिलांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी महिला पर्यटकांतून होत आहे.

मांगेली वर्षा पर्यटन प्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो पर्यटक येतात. ते सकाळी येतात आणि मौजमजा करून लगेच संध्याकाळी परततात. ते थांबावेत यासाठी परिसरात रूम व त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

माजी सरपंच सूर्यनारायण गवस

हे ही वाचा : 

Back to top button