रत्नागिरी : तिसंगी नजीक मोटारीने घेतली पेट | पुढारी

रत्नागिरी : तिसंगी नजीक मोटारीने घेतली पेट

खेड; पुढारी वृत्तसेवा : खेड-खोपी मार्गावरील तिसंगी गावानजीक मोटरीने अचानक पेट घेतला. यामध्ये मोटर जळून खाक झाली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी (दि १५) रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश जाधव हे रविवारी सायंकाळी मुंबई येथून तिसंगी गावाकडे मोटारीने ( एमएच०४एफए०४९२) जात होते. खेड-खोपी मार्गावरील तिसंगी गावानजीक आले असता मोटारीने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत शैलेश मोटारीतून बाहेर पडला. त्यानंतर गाडीतील सिएनजी टाकीतून गळती लागल्याने गॅसने पेट घेतल्याने आगीची तीव्रता आणखीनच वाढली. या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलातील दीपक देवळेकर, गजानन जाधव, सूरज शिगवण यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. चालका व्यतिरिक्त या मोटारीत अन्य प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, यावेळी मोटारी जवळच असलेल्या सुक्या गवताने देखील पेट घेतली होती. शैलेश हे तिसंगी शिवाजीनगर या ठिकाणी प्रवासी नेण्यासाठी मुंबई येथून आल्याचे समजते.

Back to top button