रत्नागिरी : गाळ उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर | पुढारी

रत्नागिरी : गाळ उपशाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर

राजापूर (रत्नागिरी) ; पुढारी वृत्तसेवा :  पुराचे शहर … नावात पुर … असे सातत्याने वर्णन केले जाणाऱ्या राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला असून, त्याचा फटका पुराबरोबरच पाणीटंचाईच्या रूपाने शहरवासीयांनाही बसू लागला आहे. त्यामुळे या नद्यांतील गाळ उपशाचा प्रश्नाने आता पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. पावसाळ्यात घराघरात पाणीच पाणी आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण अशी स्थीती राजापूर शहराची पहावयास मिळाली आहे. याला मुख्य कारण शहरातील उभय नदी पात्रातील साचलेला गाळ आहे. शहराला त्रासदायक ठरणारा गाळ उपसण्याच्या कामाला यापुर्वी मान्यता मिळाली आणि सन २००९ मध्ये गाळ उपसण्याचे काम सुरू झाले होते. चार वर्षे गाळ उपसण्याचे काम सुरू होते. मात्र आता नद्यांची स्थिती पाहिल्यास खरच गाळ उपसा झाला का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

उपसलेला गाळ किनाऱ्यालगतच पिचींग करून ठेवल्याने पावसामध्ये गाळ नदीपात्रात पसरून पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असते. गाळामुळे नदीत पाण्याचा खडखडाट झाल्याने शहरातील विहीरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा केव्हा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक राजापूर शहरवासीयांच्या डोक्यावर असलेली पुराची टांगती तलवार दूर व्हावी, याकरीता अर्जुना नदीतील वरचीपेठ पूल ते बंदर धक्का, बंदर धक्का ते कादवली नदीपात्रातील आंबेवाडी तांत्रिक विद्यालय व बंदर धक्का ते पुढे जैतापूर खाडी दरम्यान वाहणाऱ्या दोन्ही नद्यांचे प्रवाह मुख अशा पद्धतीने तीन विभागांत गाळाचा उपसा करण्याचे निश्चित करण्यात आले. याकरीता तात्कालीन आमदार गणपत कदम यांनी पाठपूरावा केल्याने, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी निधी उपलब्ध करून दिला.

अर्जुना व कोदवली नदीपात्रातील एकूण सुमारे १ लाख ९८ हजार ७७८ घनमीटर गाळ उपसण्यासाठी शासनाने सुमारे ३५ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला होता . सन २००९ साली गाळ उपसण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. पहिल्या वर्षी अत्यल्प म्हणजे सुमारे ७ हजार ७२० घनमीटर एवढाच गाळ उपसण्यात आला. त्यानंतर सन २०१० मध्ये अर्जुना व कोदवली नदीपात्रातील सुमारे ६५ हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला. तर मे २०११ अखेरपर्यंत अर्जुना व कोदवली नदीपात्रातील सुमारे ९८ हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. याकरीता सुमारे २७ लाख रूपये खर्च करण्यात आला व ८ लाख रूपये निधी शिल्लक राहिला होता. व सुमारे १ लाख घनमीटर गाळाचा उपसा करणे शिल्लक राहिले होते. त्यानंतर आजपर्यंत गाळउपशाचे काम पुन्हा सुरू झालेले नाही. निधीच्या कमतरतेमुळे गाळ उपसा रखडल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान गाळ उपसा करताना नदीपात्रातील उपसलेला गाळ किनाऱ्यालगतच पिचींग करून ठेवण्यात आला होता. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर गाळ पुन्हा नदीपात्रात पसरला आहे. त्यामुळे गाळ उपशावर झालेला खर्च वाया गेलाच शिवाय नदीपात्रही जैसे थे झाली आहेत. गाळ उपशामुळे राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येपासून सुटका होणार आहे. त्या जोडीलाच नदीपात्राची खोली वाढून जलस्त्रोत मोकळे होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या समस्येतूनही शहरवासीयांची सुटका होणार आहे.

कोदवली नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नदीकाठालगतच्या विहीरी व बोअरवेलही आटत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून भटाळी परिसरातील नागरीकांनी दोन वर्षापूर्वी स्वखर्चातून कोदवली नदीपात्र नांगरले होते. त्यामुळे या परिसरातील नदीसह लगतच्या विहीरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. त्यामुळे जर या नदीपात्रातील गाळ उपसा झाला असता, तर नागरीकांची पाणीटंचाईतून सुटका होईल. त्यामुळे शहरातील नदीपात्रातील गाळ उपसा करावा अशी मागणी शहरवासीयांतून करण्यात येत आहे. दरम्यान, अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळाचे प्रमाण वाढल्याने नजीकच्या काही वर्षांमध्ये पूराच्या समस्येमध्येही वाढ झाली आहे. मागील काही वर्षात राजापूर शहराला सातत्याने पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सलग तीन ते चार दिवस शहर पूराच्या पाण्याखाली जात असल्याने, व्यवसायिक तसेच नागरीक यांना मोठा फटका बसत आहे.

दरम्यान अर्जुना व नदीपात्रातील गाळ उपशाचा प्रश्न गंभीर बनल्याने, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे प्रयत्नशील आहेत. गाळ उपशासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून शासनाकडून निधी उपलब्ध होताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ॲड. खलिफे यांनी राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी कंपनीकडे गाळ उपसा करून देण्याची मागणी केली आहे. त्याला रिफायनरी कंपनीकडूनही हिरवा कंदील देण्यात आला आहे. मात्र रिफायनरी प्रकल्पाबाबत अद्यापही शासनाकडून कोणताही निर्णय न झालेला नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाच्या भवितव्यावरच राजापूर शहरातील गाळ उपशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यानंतर अर्जुनेसह कोदवलीकडुन वाहणाऱ्या नदीला मोठे महापूर येतात व त्यानंतर महापुराचे पाणी राजापूर शहरात घुसते आणि बाजारपेठ बंद होते . दरवर्षी पावसाळ्यात किमान चार ते पाच वेळा शहराला पुराचा वेढा बसत असतो. हा मागील अनेक वर्षातील पावसाळ्यातील अनुभव आहे, गतवर्षी तर एक आठवड्याहुन अधिक दिवस राजापूरची बाजारपेठ पुराखाली होती. त्यामुळे महापुर ही एक समस्याच राजापूरकरांसाठी बनून राहिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button