मुस्कान सोलकर : विमानात पाऊल टाकले अन् सुटकेचा श्वास सोडला | पुढारी

मुस्कान सोलकर : विमानात पाऊल टाकले अन् सुटकेचा श्वास सोडला

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. स्थानिक रहिवासीही शेजारील देशात आश्रयासाठी धावपळ करीत आहेत. युक्रेनहून रोमानियाला जाईपर्यंत जीवाची घालमेल सुरू होती. रोमानियाच्या सीमेवरही जवळपास दहा तास प्रवेशासाठी थांबावे लागले.

रोमानियामध्ये एका भारतीय उद्योजकाने मदतीचा हात दिला. तेथे दोन दिवस थांबल्यानंतर भारतात परतण्यासाठी विमानात पाऊल टाकले आणि सुटकेच्या श्वास सोडला. अल्लाहच्या कृपेने आज आपण घरात असल्याचे रत्नागिरीतील युवती मुस्कान सोलकर हिने सांगितले. त्यावेळी ती भावूक झाली होती.

युक्रेन व रशियातील तणावपूर्ण वातावरणामुळे 21 फेब्रुवारीला युक्रेन सोडून परत जाण्याची सूचना आम्हाला भारतीय दूतावासाकडून करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय परीक्षा अंतिम टप्प्यात असल्याने ती संपल्यावर निघण्याचा निर्णय सर्वच विद्यार्थ्यांनी घेतला होता. खार्किव्ह येथील वसतिगृहात जवळपास भारतातील दोनशे विद्यार्थी वास्तव्याला होते.

वातावरण तणावपूर्ण असले तरी युध्द लागलीच सुरुवात होणार नाही अशी शक्यता होती. मात्र, दोन दिवसातच रशियाने हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वस्तीगृहात अडकून पडावे लागले. याच परिस्थितीमुळे बाहेर सर्व बंद असल्याने खाद्य पदार्थही संपले होते. कधी हल्ला होईल, क्षेपणास्त्र पडेल याचा नेम नव्हता. या ठिकाणी एकाच खोलीत चार मैत्रिणी वास्तव्याला होतो. त्यात दोघी झोपायचो व दोघी जाग्या रहायचो. प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

विद्यापीठाच्या कौन्सिलरकडून भारतीय राजदुतांशी संपर्क साधला जात होता. त्यांच्या संपर्कानंतर व राजदुतांच्या सूचनांनुसार आम्हाला युक्रेन-रोमानियाच्या सीमेवर पाठविण्याची परवानगी मिळाली. पैसे असणार्‍यांनाच प्रथम प्राधान्य दिले जात होते. रोमानिया सिमेवर जाण्यासाठीही प्रचंड गर्दी असल्याने वाहतूक कोंडीमुळे रस्त्यात मध्येच उतरविण्यात आले.

त्यानंतर तब्बल आठ तास चालून युक्रेनची सीमा गाठली. या ठिकाणीही नऊ तासांनंतर आमची तपासणी होऊन रोमानियात सोडण्यात आल्याचे मुस्कानने सांगितले.

रोमानियातही तब्बल 10 तास वाट पाहावी लागली. त्यानंतर एका भारतीय उद्योजकांनी आम्हा विद्यार्थ्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. चालून व रांगेत उभे राहून पायांना सूज आली होती. त्यातूनही एकमेकांना धीर देत होतो.

केंद्र सरकारचे प्रतिनिधी सातत्याने संपर्कात होते व धीर देत होते. भारतात येण्यासाठी गर्दी खूप होती. मात्र, दोन दिवसांनंतर मला व माझ्या मैत्रिणींना भारतात येण्याचे तिकीट मिळाले. त्या ठिकाणाहून दिल्लीत आलो, त्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. तेथून पुन्हा विमानाने मुंबईत आलो. मुंबईत पालकांना पाहून जीवात जीव आला. अल्लाहच्या कृपेने मायदेशी सुखरुप आल्याचे तिने सांगितले. यावेळी घरातील सर्वच व्यक्तींचे डोळे पाणावले होते.

हेही व

Back to top button