गणपतीपुळे : अंगारकी चतुर्थीला भाविकांना समुद्रात प्रवेश बंदी | पुढारी

गणपतीपुळे : अंगारकी चतुर्थीला भाविकांना समुद्रात प्रवेश बंदी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी  उद्या (मंगळवार) अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनास येणाऱ्या भाविकांना मंदिरालगतच्या समुद्रात जाण्यास मनाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविक रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून मोठया प्रमाणात श्री गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात.

कोविड – १९ ची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर किंवा दर्शना आधी मंदिरा लगत असणाऱ्या समुद्रामध्ये आंघोळ किंवा पोहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापुर्वी अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

कोविड-१९ विषाणूमुळे जीवितहानी होऊ नये व समुद्राच्या पाण्यात पोहताना बुडून जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम प्राप्त अधिकारानुसार, नागरिकांची जीवितहानी होऊ नये म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत भाविकांना श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्रात जाण्यास आदेशाव्दारे मनाई करण्यात आली आहे.

हे ही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : सिंधुदुर्ग : डुकरासाठी लावलेल्‍या फासकीत अडकला बिबट्या…

Back to top button