सत्तेसाठी केसरकर काहीही करू शकतात! : रुपेश राऊळ | पुढारी

सत्तेसाठी केसरकर काहीही करू शकतात! : रुपेश राऊळ

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा आ. दीपक केसरकर यांना शिवसेनेने दोन वेळा आमदारकी व त्यातील पाच वर्षे मंत्रिपद उपभोगण्याची संधी दिली. मात्र, तरीही त्यांची हाव भागलेली नाही, आता पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात, असा टोला शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आ. केसरकर यांना लगावला. आपली आजपर्यंत राजकीय कारकीर्द ना. राणे यांच्या विरोधात घालविणारे आ. केसरकर आता ना. राणे व त्यांच्या पुत्रांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत, काय? असा सवाल श्री. राऊळ यांनी केला.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊळ बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र परुळेकर, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हा संघटक शब्बीर मणीयार, योगेश नाईक, गुणाजी गावडे, विशाल सावंत, आबा केरकर आदी उपस्थित होते.

रुपेश राऊळ म्हणाले, गेले काही दिवस आ. दीपक केसरकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आ.आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. शिवसेनेने त्यांना पाच वर्षे मंत्रिपद तसेच दोन वेळा आमदारकी दिली, मात्र एवढं मिळूनही ते समाधानी नाहीत. आता पुन्हा मंत्रिपद मिळेल या आशेने ते शिवसेना नेतृत्व व नेत्यांवर टीका करत आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज राज्यभर फिरत आहेत. पण गेले 55 दिवस आ. केसरकर आपल्या मतदारसंघात एकदाही फिरकलेले नाहीत.

मंत्री, आमदार म्हणून त्यांनी कबुलायतदार गावकर जमीन प्रश्‍न सोडविण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. मात्र त्याचे खापर ते खा. विनायक राऊत यांच्यावर फोडू पहात आहेत. प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भरघोस निधी देऊनही त्यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी हे हॉस्पिटल उभारण्यात अडथळे आणले.असे आरोप श्री. राऊळ यांनी आ. केसरकरांवर
केले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सावंतवाडी दौर्‍यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आपण नेहमी शांत व संयमी असल्याचे सांगणार्‍या आ.केसरकरांचा गद्दार चेहराही आजा जनतेने पाहिला आहे, अशी बोचरी टीका श्री. राऊळ यांनी केली. मात्र या परशुरामाच्या भूमीमध्ये गद्दारीला थारा नाही. सावंतवाडी मतदारसंघातील जनताच त्यांना या गद्दारीची किंमत मोजायला लावेल, असा विय्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्‍त केला.

एकाही पक्षाची त्यांना जाणीव नाही
आ. केसरकर बॉम्ब कसला टाकणार, त्यांची संधीसाधू व विश्‍वासघातकी भूमिका जनते समोर आली आहे. त्यांच्यावर आता मतदारांचा विश्‍वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना संत म्हणतात, हा संतांचा घोर अवमान आहे. काँग्रेसने त्यांना नगरसेवक ,नगराध्यक्ष केले. राष्ट्रवादीने त्यांना आमदार केले. शिवसेनेने आमदार, मंत्री केले. मात्र या एकाही पक्षाची त्यांनी जाणीव ठेवलेली नाही. आता केवळ मंत्रीपदासाठी त्यांनी पुन्हा गद्दार केली आहे,अशी टीका जिल्हा शिवसेनेचे प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.

या घोषणांचे काय झाले?

‘चांदा ते बांदा’ योजना गाजावाजा केला. त्यासाठी वर्षाला 150 ते 175 कोटी रुपये मिळाले. मात्र, या योजनेतून काय कामे झाली? याबरोबरच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, चष्मा कारखाना, सेटटाँप बॉक्स अशा घोषणांचे काय झाले? याची उत्तरे आ. केसरकरांनी जनतेला द्यावीत, अशी मागणी डॉ. परूळेकर यांनी केली.

हेही वाचा

Back to top button