मालवण : स्कुबा डायव्हिंग बोट मालक, चालकासह 7 जणांना अटक | पुढारी

मालवण : स्कुबा डायव्हिंग बोट मालक, चालकासह 7 जणांना अटक

मालवण : दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत मंगळवारी रात्री 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (52, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (50, रा. देवबाग) यांच्यासह अन्य पाच जण अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.बुधवारी सायंकाळी त्यांना अटक करून मालवण न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर मुक्‍तता करण्यात आली.

याबाबत या बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब (36, रा. अणाव कुडाळ) यांनी मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट लाटांच्या तडाख्याने पलटी होऊन बोटीतील सुमारे 28 जण समुद्राच्या पाण्यात फेकले जाऊन दुर्घटना घडली होती. यात अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख व पुणे येथील डॉ. स्वप्निल मारुती पिसे या दोन पर्यटकांचा नाकातोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला होता. तर अन्य पर्यटक अत्यवस्थ स्थितीत होते.

या प्रकरणी पर्यटक लैलेश परब यांनी मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर रात्री उशिरा बोट मालक, चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.यामध्ये बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (52, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (50, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (23, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (32, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (31, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (39, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (54, रा. देवबाग) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंदर विभागाकडून पर्यटक व्यावसायिकांना नोटिसा

मालवण तारकर्ली येथे बोट बुडून झालेल्या दुर्घटनेनंतर बुधवारी मालवण बंदर विभागाच्या अधिकार्‍यांनी मालवणातील पर्यटन व्यावसायिकांना लाईफ जॅकेट सक्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. बंदरजेटीवर जाऊन प्रवासी होडीवर पर्यटकांना लाईफ जॅकेट परिधान केले जाते का, याची खात्री केली. यावेळी पर्यटकांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना केल्या.

Back to top button