"हे ठाकरे सरकार म्हणायचं की, पवार सरकार"; शिवसेना खासदार किर्तीकर यांचा महाविकास आघाडीवर निशाणा | पुढारी

"हे ठाकरे सरकार म्हणायचं की, पवार सरकार"; शिवसेना खासदार किर्तीकर यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

दापोली, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या निधी वाटपावरून शिवसेनेचे खा. गजानन किर्तीकर यांनी राज्य सरकावर थेट निशाणा साधला आहे. “हे नेमकं ठाकरे सरकार म्हणायचं की, पवार सरकार”. असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.२०) दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारवरदेखील निशाणा साधला.

किर्तीकर म्हणाले, एका आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५/१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी आहे. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून  निधी मिळवितो मात्र, निधीची पळवापळवी केली जात आहे. “आम्ही म्हणायचे, हे ठाकरे सरकार आहे, पण याचा प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली.

शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री, अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात एका सभेत यापूर्वी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनीही आता महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत, महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिला. त्यांच्या या वक्तव्याने शहरात खळबळ उडाली.

राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांना त्यानंतर कॉंग्रेसच्या मंत्रांच्या खात्यांना व सर्वात शेवटी अर्थसंकल्पातील केवळ 16 टक्के निधी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळाला असल्याची टीकाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्याला किर्तिकर यांनी दापोलीत दुजोरा देऊन निधीबाबत नाराजीचा सूर ओढला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button