रायगड : भूस्खलनग्रस्त तळीयेला वेध नव्या गावाचे...उद्ध्वस्त गाव ते आदर्श गाव एक नवा प्रवास | पुढारी

रायगड : भूस्खलनग्रस्त तळीयेला वेध नव्या गावाचे...उद्ध्वस्त गाव ते आदर्श गाव एक नवा प्रवास

रायगड ; जयंत धुळप : महाड तालुक्यातील तळीये हे 1447 लोकसंख्येचे गाव अत्यंत सुखाने आणि आनंदाने नांदणारे. गावातील घरटी सर्वसाधारणपणे एकजण नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यात राहणारा. काहीजण महाडच्या औद्योगिक वसाहतीत नोकरीला, तर उर्वरित ग्रामस्थांचा शेती हाच व्यवसाय… 21 जुलै 2021 पर्यंत अत्यंत सुखाने आणि आनंदाने नांदणार्‍या या गावाच्या पाठीशी खंबीरपणे वर्षानुवर्षे उभा राहिलेला देवीचा डोंगरच कोपला आणि तीव्र अतिवृष्टीमुळे 22 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गावावर कोसळला आणि संपूर्ण गाव भूमातेच्या उदरात गडप झाले.

सर्वत्र हाहाकार माजला… संपूर्ण महाराष्ट्रच हादरून गेला. रोजगार, नोकरीनिमित्त जे गावाबाहेर होते ते वाचले आणि कुणी आई, तर कुणी वडील, तर कुणी मुलगी-मुलगा, कुणी आजी-आजोबा, कुणी मामा-मावशी यांना गमावले, तर काही कुटुंंबांचा संपूर्ण वंशच संपुष्टात आला. एकूण 87 ग्रामस्थांचा या आपत्तीत मृत्यू झाला. आपत्तीपश्चात थांबून चालणार नव्हते. ज्यांना राहायला घरच राहिले नाही अशा 26 कुटुंबांकरिता तत्काळ कंटेनर हाऊसची व्यवस्था करण्यात आली. आजही त्यामध्ये ही 26 कुटुंबे राहत आहेत.

दरम्यान, आता हे तळीये गाव येत्या काही महिन्यांत नव्या संकल्पनेतून आदर्श गाव म्हणून उभारण्यात येत असून, प्रीकास्ट सँडविच पॅनेल वॉल सिस्टीमसह प्रीफॅब स्टील या अत्याधुनिक गृहनिर्मिती तंत्रज्ञानातून येथील एकूण 263 बाधित कुटुंंबांकरिता उभारण्यात येत असलेली 263 घरे ही वैशिष्ट्यपूर्ण आणि कोणत्याही हवामानात खंबीरपणे उभी राहणारी घरे राज्यात प्रथमच होणार आहेत.

महाड तालुक्यातील तळीये येथे झालेल्या या न भूतो न भविष्यती अशा या नैसर्गिक आपत्तीनंतर सत्वर 26 जुलै 2021 रोजी जी शासकीय बैठक झाली त्या बैठकीत अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यामुळे तळीये आणि त्याच्या आजूबाजूच्या कोंडाळकर वाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी, खालचीवाडी, शिंदेवाडी, कुंभेनळी व चर्मकारवाडी या वाड्यांचे पुनर्वसन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण संस्था (म्हाडा) मार्फत करण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आणि आपत्तीपश्चात या गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया आपत्तीनंतर केवळ तीन दिवसांतच सुरू झाली.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी अपेक्षित पुनर्वसन प्रस्ताव प्रभावीपणे मांडला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनीदेखील यावेळी बाधित ग्रामस्थांच्या वतीने सूचना मांडल्या. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेटृटीवार यांनीदेखील या प्रस्तावास याच बैठकीत मान्यता दिली.

तळीये आणि सलग्न वाड्यांतील या कुटुंबांचे पुनर्वसन करावयाच्या ठिकाणची 26 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण संस्था (म्हाडा) यांचे स्थापत्य तज्ज्ञ आर. के. महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. खासगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धतीने संपादित करावयाच्या एकूण 17-96-3 हे.आर. जमीन क्षेत्राची मोजणी करण्यात आलेली असून, मोजणी नकाशादेखील सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार एकूण 263 कुंटुंबाकरिता, तीन गुंठेप्रमाणे प्रतिकुंटुंब आवश्यक जमीन क्षेत्र 7.89.0 हे.आर. निश्चित केले आहे.

नागरी सुविधांकरिता 40 टक्के याप्रमाणे आवश्यक 3.10.0 हे.आर. जमीन क्षेत्र आवश्यक आहे. एकूण आवश्यक जमीन 10.99.0 हे.आर. असून, कंटूर सर्व्हे व मोजणीअंती निश्चित केलेले अंतिम क्षेत्र 17.96.3 हे.आर. असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी दिली आहे.

3,000 चौ. फूट जागेवर 600 चौ. फूट चटई क्षेत्रफळाचे घरकूल

तळीये गांवासह सलग्न 8 वाडीतील 263 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रीकास्ट सँडविच पॅनेल वॉल सिस्टमसह प्रीफॅब स्टील अत्याधूनिक गृनिर्माण रचनेचे 3000 चौ. फूट जागेवर 600 चौ. फूट चटई क्षेत्रफळाचे घरकूल म्हाडाच्या निधीतून बांधण्याचा निर्णय झाला. तळीये व सलग्न 8 वाड्यांमधील या 263 कुटुंबांकरिता उभारण्यात येणार्‍या या घरांची प्रत्यक्ष उभारणी योजना अंमलात आणण्याची सर्वस्वी जबाबदारी याच आपत्तीकाळात रायगडच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झालेल्या डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे शासनाने सोपवली आणि डॉ.कल्याणकर यांनी देखील ती एक आव्हान म्हणूनच स्वीकारली आणि प्रत्यक्ष गावांत पोहोचून कार्यवाहीला गती दिली.

तळीये गावासह कोंडाळकरवाडी-बौध्दवाडी, मधलीवाडी , खालचीवाडी, शिंदेवाडी, कुंभेनळी आणि चर्मकारवाडी या एकूण सहा वाड्यांमधील 263 बांधित कुटुंबांना ही घरे देण्याचे नियोजन करण्यात आले. या सर्व कुटुंबांची एकूण लोकसंख्या 1360 असल्याचे या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

घर नव्हे गावपण असणार्‍या गावाची उभारणी

बाधित कुंटुंबांना केवळ घरे देण्याचे काम करायचे नाही तर त्या घरांना घरपण आणि घराभोवतीच्या नव्या जागेला गावपण देखील असलेच पाहिजे, जेणे करुन पून्हा एकदा येथील कुटुंबे सुखाने आनंदाने आणि समाजजीवनासह राहू शकतील अशा भावनेतून अत्यंत संवेदनशील नियोजन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले.

त्याकरिता त्यांनी महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि अन्य काही अधिकारी यांच्यासह अनेकदा या तळाये गावांत जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना आणि अपेक्षा अत्यंत काळजीपूर्वक जाणून घेऊन त्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये उतरवल्या असल्याने ग्रामस्थांकडून देखील यंत्रणेला संपूर्ण सहकार्य प्राप्त होत आहे.

भूसंपादनाकरिता 12 कोटी 60 लाखांचा निधी

तळीये दरडग्रस्त भागातील या 263 कुटुंबांच्या पुनर्वसनाकरिता भूसंपादन कायद्याच्या तरतुदीनुसार जमीन भूसंपादन करण्यास प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झाली असून, त्याकरिता एकूण अपेक्षित 12 कोटी 59 लाख 83 हजार 314 रुपयांचे अनुदान देखील येत्या काही दिवसांत रायगड जिल्हा प्रशासनास प्राप्त होत असून, त्यानंतर सत्वर संपादित जागा ताब्यात घेऊन घर उभारणीच्या कामास प्रारंभ होणार असल्याचे डॉ. कल्याणकर यांनी सांगितले.

12 कोटी 59 लाख 83 हजार 314 रुपये या शासनाकडून मंजूर होणार्‍या अनुदानात भूसंपादनाकरिता 2 कोटी 92 लाख 17 हजार 761 रुपये, नागरी व सार्वजनिक सोयी-सुविधांकरिता 7 कोटी 89 लाख 74 हजार 607 रुपये, विद्युत पुरवठ्याकरिता 43 लाख रुपये, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थेकरिता 97 लाख 41 हजार 564 रुपये, तात्पुरते पुनर्वसन कंटेनर चौथरा तयार करण्यासाठीचे 16 लाख रुपये, रस्ते व ड्रेनेज लाईनकरिता 12 लाख रुपये तर तात्पुरते पुनर्वसनाकामी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 9 लाख 49 हजार रुपये अनुदानाचा समावेश असल्याचे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.

अत्याधुनिक गृहनिर्माण पद्धतीतून केवळ दीड महिन्यात घरे उभी राहणार

तळीयेसह कोंडाळकरवाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी, खालचीवाडी, शिंदेवाडी, कुंभेनळी व चर्मकारवाडी येथील 263 कुटूंबांचे पुनर्वसन करण्याकरीता अभिन्यास नकाशा संच (ले-आऊट प्लॅन) म्हाडा कडून प्राप्त झाला असून हा ले-आऊट प्लॅन मंजुरीकरिता सहाय्यक संचालक नगररचना यांना पाठविण्यात आला आहे, तोही येत्या काही दिवसांत मंजूर होईल आणि प्रत्यक्ष घर उभारणीस प्रारंभ होईल. प्रीकास्ट सँडविच पॅनेल वॉल सिस्टमसह प्रीफॅब स्टील या अत्याधुनिक गृहनिर्माण पद्धतीतून ही घरे उभारण्यास केवळ दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

Back to top button