रत्नागिरी : भुरट्या चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई | पुढारी

रत्नागिरी : भुरट्या चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लांबवणार्‍या दोन संशयितांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (दि.२६) खंडाळा येथून आवळल्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नाचणे येथील मोबाईल शॉपी तसेच कुवारबाव येथील टायरचे दुकान आणि त्याशेजारील फोटो स्टूडिओ फोडून चोरी केल्याचे मान्य केले.

त्यांच्याकडून जप्त मुद्देमाल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक असा एकूण ५ लाख ९१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी २९ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत केली.
अमित रविंद्र भोसले (२२,रा.रिंगी फाटा खंडाळा,रत्नागिरी) आणि प्रशांत प्रकाश विर (१९,रा.कळझोंडी वीर वाडी,रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे या पथकाने खंडाळा येथे या दोघांना ताब्यात घेउन चौकशी केली तेव्हा, ६ सप्टेंबर रोजी कुवारबाव येथील दुर्गा टायर दुकान व त्याच्या शेजारील दर्पण फोटो स्टूडिओ या दुकानांची शटर उचकटून टायर, कॅमेरा चोरुन नेल्याचे त्यांनी कबूल केले. त्यात चोरीला गेलेल्या टायरपैकी ६ टायर्स, कॅमेरे व इतर साहित्य असा १५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच त्यांनी २३ सप्टेंबर रोजी नाचणे येथील मोबाईल वर्ल्ड या दुकानाचे शटर उचकटून मोबाईल व रोख रक्कम असा १ लाख ८८ हजार ५०० मुद्देमाल लांबवला होता. त्यापैकी १२ मोबाईल हॅन्डसेट,एक ब्ल्यू टूथ इयर फोन व रोख रक्कम असा एकूण १ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शहर पोलिस करत आहेत.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार शांताराम झोरे, प्रशांत बोरकर, नितीन डोमणे, अरुण चाळके, पोलिस नाईक रमीज शेख, पोलिस शिपाई अतुल कांबळे यांनी केली. तसेच या कामगिरीत चाफे गावचे पोलिस पाटील हिराजी तांबे यांनी सहकार्य केले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधिकक्षक मोहित कुमाार गर्ग यांनी अभिनंदन केले असून यापूढेही अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याबद्दल प्रोत्साहन दिले.

Back to top button