वेंगुर्ले उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांचा राजीनामा | पुढारी

वेंगुर्ले उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांचा राजीनामा

वेंगुर्ले ; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विशेष सभेत मत्स्य बाजारपेठेतील जुन्या 15 गाळेधारकांना पुन्हा त्याच जागी गाळे मिळण्याबाबत सकारात्मक प्रक्रिया व निर्णय होताना दिसत नाही. या गाळेधारकांवर होत असलेला अन्याय सहन होत नसल्याने मी स्वखुशीने उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची माहिती शिवसेनेच्या उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवीन मच्छी मार्केट उभे करताना विस्थापित झालेल्या ‘त्या’जुन्या 15 गाळेधारकांचा प्रश्‍न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गुरुवारी नगरपरिषदेमध्ये झालेल्या बैठकीत त्यांच्या बाजूने ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेने आपण या गाळेधारकांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. तसेच, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन या व्यापार्‍यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत विषय घेऊन सातत्याने व्यापार्‍यांबरोबर आम्ही राहिलो. परंतु, नगरपरिषदेच्या सत्ताधार्‍यांकडून गाळेधारकांच्या बाजूने निर्णय होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलल्याचे सौ. राऊळ यांनी सांगितले.

शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, शहराध्यक्ष अजित राऊळ, सचिन वालावलकर, बाळा दळवी, विवेक आरोलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button