Dragon Fruit Cultivation : आधुनिक शेतीचा मंत्र, दापोलीत पहिल्यांदाच फुलली ड्रॅगन फ्रूटची शेती | पुढारी

Dragon Fruit Cultivation : आधुनिक शेतीचा मंत्र, दापोलीत पहिल्यांदाच फुलली ड्रॅगन फ्रूटची शेती

दापोली: प्रवीण शिंदे : दापोली तालुक्यातील दमामे – तामोंड  येथील तरुण शेतकरी सुरज  कांदेकर आणि त्यांचे वडील सुरेश  कांदेकर यांनी लॉकडाऊन कालखंडात आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतीत ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Cultivation) या परदेशी पिकाची लागवड केली असून दापोली तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

Dragon Fruit Cultivation : दापोलीत ड्रॅगन फ्रूटचा पहिलाच प्रयोग

सुरज  कांदेकर आणि त्यांचे वडील सुरेश  कांदेकर यांनी  लॉकडाऊन काळात आधुनिक शेतीचा मंत्र जपत, त्यांनी आपल्या शेतीत ड्रॅगन फ्रूट या परदेशी पिकाची लागवड केली असून दापोली तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यांनी २०२१ मध्ये आपल्या  शेतीत ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. त्यासाठी त्यांनी कृषी क्षेत्राशी काही संबंधित लोकांकडून माहिती मिळवली. पंढरपूरमधील एका नर्सरी मधून त्यांनी ही रोपं मागवली. आणि तर्कशुद्ध पद्धतीनं लागवड केली. त्यासाठी त्यांनी शेतीत १२ बाय ८ अंतरावर खड्डे खोदून सीमेंट पोल रोवले. त्या पोलच्या भोवती मातीचे बेड तयार करून, एका पोल भोवती 4 रोप या पद्धतीनं लागवड केली. अशी एकूण त्यांनी ४५० रोपांची लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रुटची रोपे आता जोम धरू लागली असून काही दिवसात त्यांना कळ्या येण्यास सुरुवात होईल असे शेतकरी सांगत आहेत.

न्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असा शेतीतील प्रयोग
न्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असा शेतीतील प्रयोग

लॉकडाऊन काळात आधुनिक शेतीचा मंत्र

Dragon Fruit Cultivation लॉकडाऊन कालखंडात माझा मुलगा सूरज याने ड्रॅगन फ्रुटची शेती करायची असे मनाशी ठरविले. त्यानुसार आम्ही ड्रॅगन फ्रुटची शेती केली. यासाठी कांदेकर यांनी या पिकाला सेंद्रीय खत वापरलं, जेणेकरून फळाचं चांगलं पोषण झालं पाहिजे. यासाठी कांदेकर यांना येथील सरपंच गंगाराम हरावडे आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत २ लाखांपर्यंत खर्च झाला आहे. जी मेहनत आम्ही घेतली आहे, त्यात नक्की यश मिळेल अशी आशा या वेळी शेतकरी सुरेश कांदेकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त  केली.

Dragon Fruit Cultivation : कसं आहे ड्रगन फळ

ड्रगन हे एक प्रकारचे फळ आहे. हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्याने लोकांमध्ये त्याची फार उत्सुकताआहे. (Dragon Fruit Cultivation) ड्रॅगन फळांचे शास्त्रीय नाव हायलोसीरीयस अंडाटस असून कॅक्टस कोरफड वर्गातील ही वनस्पती आहे. ड्रॅगन फ्रूट शरीरासाठीही खुप लाभदायक आहे. यामुळेच याची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. ड्रॅगन फ्रुटपासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते. सौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणूनही याचा वापर करण्यात येतो. सामान्यतः ड्रॅगन फ्रुट थायलंड, व्हिएतनाम, इस्राईल आणि श्रीलंकेमध्ये लोकप्रिय आहे. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका होते. तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासाठीही मदत होते.

आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूट
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूट

आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूट

ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. डेंग्यूसारखा  आजार झालेल्या रुग्णांच्या पांढऱ्या पेशा कमी झालेल्या असतात. या कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी डाॅक्टरांकडून रुग्णांना ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो शिवाय शरीरासाठी त्याचे आरोग्यदायी लाभ भरपूर असल्याने स्थानिक बाजारात मागणीही अधिक आहे.

या देशात केली जाते ड्रॅगन फ्रूट शेती

मूळ मेक्‍सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.

ड्रॅगन फ्रूट भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक फळपीक

ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्‍वासक फळपीक झाले आहे. मूख्यत: मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस  ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया या नावानेही संबोधले जाते.

पाहा व्हिडीओ : नाशिकच्या आदिवासी शेतकऱ्याचे आयुष्य मोगरा शेतीने बनवले सुगंधित

Back to top button