होमपेज › Youthworld › तू कशी दिसतेस गं...?

तू कशी दिसतेस गं...?

Published On: Jun 02 2019 6:42PM | Last Updated: Jun 03 2019 4:30PM
सीमा पाटील

कुणी म्‍हणाले तर  तु कशी दिसतेस गं...?...तर जशी आहे तशीच मी दिसते पण माझ्‍यासाठी माझे असणे, मनाचे सौंदर्य  महत्‍त्‍वाचे आहे, असे सांगायला विसरु नका.  त्‍यामुळे 'looks dosen't matter ..be own'....हे विसरु नका

'तू कशी दिसतेस गं...? हा प्रश्‍न प्रत्‍येक स्‍त्रीच्‍या आयुष्‍यात एकदा नाही तर हजारवेळा कुणी ना  कुणी तरी विचारलेला असतो. तेव्‍हा साहजिकच आपल्‍या मनाला देखिल हा प्रश्‍न पडतो 'की आपण कसे दिसतो?'. हा प्रश्‍न प्रत्‍येक मुलीस पडत असतो. तमाम मुलींना सतावणार्‍या याच प्रश्‍नाचे उत्तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री काजल अगरवालने तिच्‍या सोशल मीडिया पोस्‍टमध्‍ये दिले आहे. 

अभिनेत्रीचे आयुष्‍य सौंदर्याच्‍याभोवती फिरत असते. मेकअप शिवाय एखाद्‍या अभिनेत्रीचे आयुष्‍य रिकाम्‍या 'थिएटर'सारखे असते. पण मेकअप पाठीमागेदेखील एक चेहरा आहे हे आपण विसरतो. ज्‍याप्रमाणे आपला जीवनसाथी आपल्‍या प्रत्‍येक सुखाच्‍या आणि दु:खाच्‍या क्षणात आपल्‍यासोबत असतो. त्‍याचप्रमाणे मेकअप देखील प्रत्‍येक अभिनेत्रीच्‍या आयुष्‍यात पडद्‍यावर अशाच सुखाच्‍या आणि दु:खाच्‍या प्रसंगात साथ देत असतो. याविषयीचे सत्‍य काजल अगरवालने तिच्‍या पोस्‍टमधून मांडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

टीव्‍ही लावाला किंवा कोणत्‍या शहरात गेला की तिथे नजेरस पडतात फक्‍त मोठमोठी होर्डींग्स व त्‍यावरील सौंदर्य प्रसाधनाच्‍या जाहिराती. या होर्डींग्सवर किंवा जाहिरातीत पाहायला मिळतात एकापेक्षा एक सुंदर चेहर्‍याच्‍या अभिनेत्री आणि मॉडेल. मुळात सुंदर दिसण्‍यामध्‍ये वाईट काहीच नाही. या जाहिराती व होर्डींग्स पाहिल्यानंतर सुंदर दिसण्‍याचा मोह आवरता आवरत नाही. मग कशाचाही विचार न करता आपण या नकली सौंदर्याच्या दुनियेत सुंदर दिसण्‍यासाठी क्रीम, मेकअप यासारख्‍या साधनांचा वापर सुरु करतो. मात्र या आभासी दुनियेत आपण आपल्‍या मनाची सुंदरता हारवून बसतो. व हरणासारखे कस्‍तुरी म्‍हणून मृगजळापाठिमागे धावत बसतो. 

बर्‍याचवेळा लोकांच्‍याकडून दिसण्‍यावरुन, रंगावरुन प्रश्‍न विचारले जतात. यामुळे मानसिक ताण येतो. त्‍यावेळी या  सौंदर्य प्रसाधनांच्‍या जाहिरातींच्‍या बर्‍याच मुली आहारी जातात. अशावेळी आपण जसे आहे तसे स्‍वीकारायला शिकले पाहिजे. मनाचे सौंदर्य चेहर्‍यावर दिसत असते. त्‍यामुळे सत्‍य स्‍वीकारायला शिका, असा सल्‍ला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री काजल अगरवालने दिला आहे.

यापूर्वीही नंदिता दास, बॉलिवूड क्वीन कंगना रनौत तसेच दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीनेही सौंदर्य प्रसाधनाच्या जाहिराती करण्‍यास नकार देऊन सौंदर्याची वेगळी परिभाषा जगासमोर मांडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. साई पल्लवीने २ कोटीच्‍या सौंदर्य प्रसाधनाच्‍या जाहीरात करण्‍यास नकार दिला. एक अभिनेत्री म्‍हणून साई पल्लवीच्‍या निर्णय कौतुकास्‍पद आहे. 

धावपळीच्‍या जगात प्रत्‍येकीसाठी मेकअप ही गरज बनली आहे. प्रत्‍येकीला मेकअप आवडतोच असे नाही. कामाची गरज म्‍हणून काहीजण मेकअपने बाह्य सौंदर्य खुलवण्‍याचा प्रयत्‍न करत असतात. पण या सोशल मीडियाच्‍या अभासी जगाला बळी पडण्‍यापेक्षा प्रत्‍येक मुलीने मनाच्‍या कोमलतेला जपले पाहिजे. त्‍याहून मोठे जगात कोणतेच सौंदर्य नाही. 

फेअरनेस क्रीमच्‍या जाहिराती केवळ त्वचेचा रंग उजळवण्याचे म्‍हणजे गोरे होण्‍याचा दावा करता, यासोबतच गोरा रंग चांगली नोकरी, मनासारखा जोडीदार मिळवून देण्‍यास मदत करते, असे या जाहीरातीतून ओरडून -ओरडून सांगितले जाते. त्‍यामुळे सौंदर्याची भाषा म्‍हणजे गोरा रंग काहीसे मुलींच्‍या बनावर कोरण्‍याचे काम या जाहीराती करत असतात. रंगाने काळे असने म्‍हणजे मोठे पाप अशी मानसिकता तयार केली जाते. बाजारतही मोठ्‍याप्रमाणात रंग  उजळवणाऱ्या उत्‍पादनाची संख्‍या आहे.

विशेष म्‍हणजे आजही बॉलिवूडमधील बर्‍याच अभिनेत्री सौंदर्य प्रसाधनाच्‍या जाहीराती करताना दिसतात. या जाहीरातीतून मुलींचे एकप्रकारे खचीकरणच केले जाते.  गोरा रंग, सुंदर असणे म्‍हणजे सर्वस्‍व असे अभासी जग या फेअरनेसच्‍या जाहीरातीनीं मुलींच्‍या मनात निर्माण केले आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. काळा किंवा गोरा या रंगापलीकडे माणसाचे अस्‍तित्‍व त्‍यांच्‍या मनाची कोमलता आणि विचाराची सुबकता या गोष्‍टी जीवन जगण्‍यासाठी महत्‍त्‍वाच्‍या आहेत. सर्वांनी याच गोष्‍टी हायलाईट केल्‍या पाहिजेत. 

अभिनेत्री काजल अगरवालने तिचा विना मेकअपचा एक फोटो इन्‍स्‍टाग्राम अकांऊटवर शेअर केला आहे. यावरुन तिच्‍या या  फोटोविषयी सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्‍या आहेत. मात्र काजलचा हा फोटो प्रत्‍येक मुलीस अभिमान वाटाव असाच आहे. कारण यामध्‍ये रिअल काजल अगरवाल पाहायला मिळते. मेकअप तिच्‍यासाठी फक्‍त झगमगीच्‍या दुनियेत जगण्‍याचे साधन आहे. या धावपळीच्‍या दुनियात आपण आपले मन आनंदी ठेवण्‍याचे प्रयत्‍न केला पाहिजे. आपण जसे आहोत तसे स्‍वीकारण्‍यातच मनाचे सौंदर्य आहे आणि प्रत्‍येक स्त्रीने हीच मनाची सुंदरता जपण्‍याच्‍या प्रयत्‍न केला पाहिजे. हाच संदेश काजलने यातून न कळत सर्व मुलींना आणि समस्त स्रियांना देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

अभिनेत्री काजल अगरवाल सोशल मीडिया पोस्‍टमध्‍ये म्‍हणते की...‘लोक आता स्वत:लाच ओळखू शकत नाहीत. कदाचित आपण शारीरिक आकर्षणाने झपाटलेल्या जगात वावरत आहे. म्हणूनच आपण सोशल मीडियामुळे स्वत:ला जसे आहोत तसे स्वीकारू शकत नाही. यामुळेच सौंदर्य प्रसाधनांवर कोट्यवधी रुपये खर्च करतो. प्रत्येक ठिकाणी आपले दिसणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. यामागे धावणे  किंवा स्वत:ला सगळ्यांपासून दूर ठेवणे यापेक्षा एक मध्यममार्ग उत्तम आहे. स्वत:बद्दलची खोटी प्रतिमा तयार करण्यापेक्षा आपण जसे आहोत तसे स्वीकारणे हा उत्तम मार्ग आहे. मेकअपने आपले बाह्य सौंदर्य तर खुलून येते पण आपण कोण आहोत हे आपले चारित्र्य सांगते. आपण जसे आहोत तसे स्वीकारणे यातच आपले खरे सौंदर्य लपलेले आहे. 

त्‍यामुळे कुणी म्‍हणाले तर  तु कशी दिसतेस गं...?...तर जशी आहे तशीच मी दिसते पण माझ्‍यासाठी माझे असणे, मनाचे सौंदर्य  महत्‍त्‍वाचे आहे, असे सांगायला विसरु नका.  त्‍यामुळे 'looks dosen't matter ..be own'....हे विसरु नका