Sun, Apr 21, 2019 05:41होमपेज › Youthworld › माझी गडकोटमय दिवाळी : विक्रम रेपे

माझी गडकोटमय दिवाळी : विक्रम रेपे

Published On: Nov 06 2018 8:45PM | Last Updated: Nov 06 2018 8:45PMदिवाळी सण म्हटलं की पहिल्यांदा बालपण आठवतं. नवीन कपडे, फटाके, फराळ याचं समिकरण अगदी तंतोतंत जुळलेला सण म्हणजेच दिवाळी. यात परमोच्च आनंद म्हणजे शाळेला सुट्टी आणि अभ्यासातून मिळालेली थोडी मोकळीक. त्यामुळे मित्र, खेळ आणि फराळावर ताव मारणे एवढेच विषय डोक्यात. 

खास दिवाळीसाठी खरेदी केलेली नवीन कपडे घातली की आपलंच व्यक्तिमत्व वेगळं भासायच. कपडे कोणाची भारी आणि कोठून घेतली यावर गप्पाचा फड रंगायचा. त्यातच अतिश्रीमंतांचं एखाद दुसरं कार्टं नवीन आणलेल्या सगळ्या गोष्टी पैशात मोजून दाखवायचं. हेच पैश्यामध्ये यशाचं मोजमाप करण आजही खटकतंच. असा विषय आला की कायम बडबडत राहणारा मी शांत राहायचो, कारण मला या सगळ्यांपेक्षा वेगळीच आस लागलेली असायची. याच दिवाळी मधली एक गोष्ट मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही कायमची घर करून आहे ती म्हणजे मातीचा किल्ला बांधणी. 

शिवछत्रपतींचं अगदी लहानपणापासून आकर्षण. कदाचित ते रक्तातूनच आले असेल म्हणा. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात एसी मध्ये बसून जगात काय चाललं आहे याची खमंग चर्चा करण्यापेक्षा निसर्गात रमून मातीचा सुगंध नसानसांत भिनवनं कधीही उत्तम. कदाचित यासाठीच दिवाळीत मातीचे किल्ले निर्मितीचा घाट घालण्याची प्रथा पडली असावी. गडकोट भ्रमंती हा आवडीचा विषय तो सदैव जोपासला जाईलच पण ही आवड वाढवली ती याच दिवाळीच्या किल्ल्यानी. 

किल्ला बांधायचा म्हणजे माती, विटा पाहीजेतच. मग प्राथमिक सुरुवात याच शोधमोहीमेतून व्हायची. नवीन घर बांधणी सुरू असलेल किंवा पडक घर शोधायचं आणि तिथून माती, दगड, विटा गोळा करून आणायच्या. घरातली जुनी धान्याची पोती हळूच आणून त्याला बुरुजा सारखा आकार द्यायचा आणि त्यावर माती लावायची. वर्गणी काढून कुंभारगल्लीतून किल्ल्यावर ठेवायला चित्र विकत आणायची आणि स्वतःच रणांगणावर लढायला जायच्या अविर्भावात तोफा आणि मावळ्यांसह ती किल्ल्यावर ठेवायची. 

यामध्ये दगड, माती, प्राणी, पक्षी, तोफा ,बुरुज, मावळे आणि दिमाखात डोलणारा भगवा ठेवायचा म्हणजे तो पहिला की ऊर अभिमानानं भरून यायचा. सगळे बालचमूना एकत्र येऊन शिवरायाचा अखंड जयघोष करत शिवप्रतिमा किल्याच्या मधोमध ठेवायची आणि शिवरायांना नमस्कार करायचा, किल्ले प्रदक्षिणा घालायची आणि लागायचं दिवाळीतील आवडीच्या फटाके उडवायच्या कामाला. 

दिवाळीची खरी आठवण म्हणजे या किल्ल्या जवळ गेलं की मातीचा छान सुगंध यायचा तो मनामध्ये आजही तसाच आहे चिरतरुण. दुसऱ्या गल्लीत जाऊन त्यांनी कुठल्या किल्ल्याची प्रतिकृती केली आहे याची उत्सुकता सुध्दा असायची. यातूनच प्रतापगड, रायगड, राजगड सारख्या वेगवेगळ्या किल्ल्याची माहिती मिळाली आणि प्रत्यक्ष भेट देण्याची प्रेरणा मिळाली. गडकोट भ्रमंती चे वेड लहानपणी पासून कदाचित यातूनच लागले असावे.

दिवाळी च्या शेवटच्या दिवशी हा बनवलेला मातीचा किल्ला बॉम्ब लावून फोडला जायचा . मी मात्र तसे करू देत नसे. मला त्या किल्ल्यावर टाकलेल्या मोहरी मधून उगवलेली हिरवळ बघायची आस असायची. तुलसी विवाह पर्यंत ही उगवलेली हिरवळ पाहून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रमल्याचा भास व्हायचा. हाच सह्याद्री शिवरायांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीला तो गनिमी काव्याच्या रूपानं याचा अभिमान वाटायचा. 

ह्याच भूतकाळातील आठवणींच्या छोटेखानी किल्ल्याचा साक्षीदार होऊयात.  येणाऱ्या प्रत्येक दिवाळीतील एक तरी दिवस राजेंच्या किल्ल्यावर प्रत्यक्ष जाऊन पणती प्रज्वलित करून साजरा करूयात. ज्या गडकोटांनी स्वराज्य रक्षणाची कामगिरी चोख बजावली ते ऐन दिवाळीत अंधारात असणे आपल्यासाठी भूषणावह नाही. चला तर मग या वर्षीची आठवणीची दिवाळी साजरी करूयात गडकोटांवर. 

धन्यवाद...