Sun, Apr 21, 2019 06:26होमपेज › Youthworld › आठवणीतील दिवाळी : शेणाच्‍या गवळणी अन् ताग्यातील कपडे..

आठवणीतील दिवाळी : शेणाच्‍या गवळणी अन् ताग्यातील कपडे..

Published On: Nov 07 2018 6:39PM | Last Updated: Nov 07 2018 6:40PMशंकर पवार, पापरी (सोलापूर)

शंकर पवार, पापरी (सोलापूर)

दिवाळी दिव्यांचा उत्‍सव..शाळांना सुटी..आनंदाला उधाण..फटाक्यांची रोषणाई..नवे कपडे..अन् मज्‍जाच मज्‍जा. शाळांना सुटी लागली की मामाच्या गावला जाण्याचे वेध बहुदा बालपणी सर्वांनाच लागतात. आमचं संपूर्ण बालपणच मामाच्या गावात गेलं. त्यामुळं आख्‍खं गाव ओळखीचं. मग दिवाळीत खूप गमती जमती असायच्या त्या सध्याच्या मुलांच्या बाबतीत कुठेतरी हरवल्याचे जाणवते. 

३-४ वर्षाचे वय असतानाच वडील वारल्याने तेव्‍हापासून लग्‍नापर्यंत मामाच्या घरीच आम्‍ही तिघे भावंडे वाढलो. सोलापूर जिल्‍ह्यातील  पापरीसारख्या खेडेगावातच आम्‍ही आतापर्यंत दिवाळी साजरी केली. आता शहरातील दिवाळी पाहताना नक्‍कीच तेव्‍हाच्या दिवाळीच्या आठवणी जाग्या होतात. मामाच्या घरात १५ माणसं आम्‍ही एकत्र राहायचो. त्यात दिवाळीला सगळे मावस भाऊ-बहिणी मामाकडे यायच्या. मग घरात २५ माणसांचा कबिला जमायचा. 

पहाटे लवकर उठून घरात चुलीवर पाणी तापायचं. दिवे लागायचे. घरात सडा रांगोळीची आणि आमची फटाके उडवण्याची, नवे कपडे घालण्याची लगबग सुरु असायची. एकाच ताग्यातून सगळ्यांने कपडे शिवले जायचे. त्यामुळे शाळेच्या गणवेशाप्रमाणे घरात सगळे सारखेच दिसायचे. सकाळी घरासमोर आजी शेणापासून गवळणी बनवायची. त्याला तरवाडाची पिवळी धमक फुले आणून आम्‍ही लावायचो. जवळच रांगोळी काढण्याची मोठ्या मुलींची घाई असायची. आम्‍ही मध्येच रेषा मारून गोंधळ घालायचो.

हे सगळं झालं की मग फराळ. एवळी मोठी बच्‍चे कंपनी तसा फराळही मोठ्या प्रमाणात तयार असायचा. मामा, मावशी, आई सगळे आचारी घरातीलच. घरात सगळे पदार्थ बनवले जायचे. घरातले सर्वजण आपआपल्या कामात दंग असायचे आणि आम्‍ही खेळण्यात. मग सुटीच्या काळात बैलगाडी जुंपून महादेवाला जाऊन यायचं. गोट्या, चिंचोकं, जिबल्या, चंपुळ्या, गजगं, सुर पारंब्या, क्रिकेट आणि असेच वेगवेगळे खेळ सुरु असायचे. यावेळी शेजारी-पाजारी गोळा झालेली मित्रमंडळीही आमच्यात सहभागी असायचे.  

दिवसभर खेळून दमल्यानंतर संध्याकाळी टीव्‍हीपुढं आमची स्‍वारी विराजमान व्‍हायची. घरावर अँटेना वार्‍यानं फिरला की पुन्‍हा चित्र येईपर्यंत जाहिरात लागलेली असायची. टीव्‍ही पाहण्यासाठी  पाणी भरणं, जनावरांना वैरण टाकणं अशी कामं अगदी फटाफट होऊन जायची. रात्री अंगणात एकाच मोठ्या ताडपत्रीवर चांदण्या बघत, गप्‍पा मारत कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. अगदी दिवाळीत आनंदाला उधाण आलेलं असायचं. 

आजही दिवाळी आली की ते बालपण आठवतं. तेव्‍हाच्या आठवणी जाग्या होतात. दिवाळीचं बदलत असणारं स्‍वरुप बघितलं की आपण अनुभवलेली दिवाळी आठवतेच आणि आताच्या मुलांपेक्षा आपण भाग्यवान असल्याचंही जाणवतं.