Thu, Apr 25, 2019 11:15होमपेज › Youthworld › मैत्र गडकाेटांशी!

मैत्र गडकाेटांशी!

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 9:00PMसह्याद्रीच्या  कड्यांनी सजलेल्या डोंगर रांगांचे गडकोट हेच खरे वैभव! शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सह्याद्री पर्वतरांगेत दडलेल्या अभेद्य गडकोटांची ताकद ओळखली होती. स्वराज्यात जवळपास साडेतीनशे किल्ले, गिरीदुर्ग होते. आज याच गडकोटांचे महत्व पुन्हा एकदा ओळखून शासनाने देखील गडसंवर्धन समितीची स्थापना केली आहे. मराठी मुलुखातील जिंदादिल तरुणाईने  आता  गडकोटांशी मैत्री जपली तर त्याला जीवनातील संघर्षासाठी, यशासाठी नवी ताकद लाभल्याखेरीज राहणार नाही.  ट्रेकिंगचा नाद करावा तो मन, मनगट आणि मेंदू दणकट असणार्‍या तरुणाईनेच ! मात्र केवळ रिकामा वेळ आहे म्हणून जंगलवाटा तुडविण्यापेक्षा आज गरज आहे ती निबीड जंगलात लपलेल्या गडकोटांची वाट चालण्याची!

खरे तर मैत्रीच करायची तर ती निस्सीम स्वामी निष्ठा  काय असते याचे प्रतीक असलेल्या पन्हाळ्याशी करा!,  दोस्ती करा ती गगनाला आपल्या कवेत घेणार्‍या उंच आणि उंच असलेल्या तोरण्याशी.. मैत्रीच करायची असेल ती  करा शिवरायांच्या आवडत्या राजगडाशी!  स्वराज्यातील तब्बल साडेतीनशेहून अधिक गडकोटांशी मैत्र भाव जपणारा जीवनाच्या लढाईत कधी हरणार नाही...कारण या प्रत्येक गडाशी शिवरायांच्या पराक्रमाची जोड आहे, मावळ्यांच्या अजोड स्वामानिष्ठेचे तोरण आहे.    

आजच्या तरुणाईला    नादखुळा ट्रेकिंगच्या धाडसाला वाव देणारे आणि  आणि छंदाची हौस भागविणार्‍या गडकोट,  आडवाटेच्या घाटवाटा  चालून गेलो तर ट्रेकिंगची हौस तर पूर्ण तर होतेच,  शिवाय गडांचे रौद्र रुप  अनुभवता येते.  पारगड, मुडागड, रांगणा, राजमाची, कोराईगड ते  खाली कर्जतजवळील  समरखिंड! किती किती नावे घ्यावीत! स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून नाव झालेला तोरणा,  राजियांचा गड आणि गडांचा राजिया म्हणून ओळख असलेला शिवरायांचा सर्वाधिक आवडता गडा म्हणजे राजगड, पन्हाळा, प्रतापगड, विशाळगड, सुधागड, रोहिडा-रायरेश्‍वर, लोणावळ्याजवळचा  राजमाची, पलिकडचा तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, ढाक भैरी,  जंगलात लपलेला  वासोटा,  घाटाखालील रसाळगड. महिपतीगड,  चंदगडजवळचाच पारगड, केंजळगड असंख्य गिरीदुर्ग! मनगट आणि मन धडधाकट करण्यासाठी जंगलवाटा पावसाळ्यात, उन्हाळ्यात आणि कडाक्याच्या थंडीत देखील धुंडाळाच पण त्याचवेळी या गडकोटांना मैत्रभाव जपत विसरू नका हाच खरा  ‘फ्रेंडशिप’डे चा सांगावा ठरावा!