Wed, Feb 20, 2019 15:28होमपेज › Youthworld › पाऊसवेडे

पाऊसवेडे

Published On: Jul 12 2018 1:45AM | Last Updated: Jul 11 2018 8:06PMहाय फ्रेंडस्, 

पावसाचं पाणी पिऊन तृप्त झालेली धरणी, हिरव्यागार पर्णांनी आच्छादलेली रानावनातील काळी माती, अल्लड बालिकेसारखे खळाळत धावणारे नितळ झरे, सागराच्या तीव्र ओढीने धावणार्‍या  नद्या, अजोड सुगंध फेकणारी पावसाने चिंब भिजलेली माळरानातील नुकतीच तरारुन आलेली नाजूक फुले, पहिल्याच मृगसरीचा नाद ऐकून डेरेदार पिसारा फुलवून थयथय नाचणारा, पिसाराश्रीमंत मयूर. असा पावसाचा मधूर नाद ऐकायचा असेल तर या पावसाच्या  सरी अंगावर झेलत पाऊसवेड्यांना डोंगर दर्‍यांकडे कूच करावीच लागेल. 

यंदाचा पाऊस तसा बर्‍यापैकी बरसतोय, गेल्या कित्येक वर्षांचा रूसवा सोडून त्याने निसर्गाची तृष्णा भागवायला सुरुवात केलीय. त्यामुळे या रिमझिमत्या पावसाची मजा घेण्यासाठी अनेक धबधब्यांकडे पाऊसवेड्यांनी कधीच पळ काढला आहे. निर्भेळ, निर्लेप, निकोपपणे झुळझुळणारे झरे, लपलपता जलप्रताप, धसधसत्या वेगाने कोसळणारे धबधबे, जलधारांत नखशिखांत न्हालेली धरणी, हिव्यागार इवल्याशा पानांवर पावसाचे थेंब अभिमानाने मिरवणारी कोवळी, नुकतीच जमिनीतून बाहेर आलेली हसणारी रोपटी यांची साथ संगत करत जीवनगाणे गायचे असेल तर पावसात बाहेर पडायलाच हवे ना!

कधी कधी मात्र हाच पाऊस झपाटल्यासारखा वेडावाकडा कोसळत राहतो, पाऊस तसा कोणाच्या मर्जीनुसार वागत नसतो, आपण तरी कोठे कोणाच्या मर्जीनुसार वागतो? म्हणूनच तो मन मानेल तिथे कोसळतो, नाही वाटलं तर अजिबात थांगपत्ता लागू देत नाही. मागच्या चार-दोन वर्षांत नाही का आपल्या डोळ्यात पाणी आले तरी पाऊसबाबा काही आला नाही, खासा रूसला.

आता सर्वत्र मस्त हिरवाई पसरलीय, डोंगरदर्‍यातून पाण्याचे आहोळ धावताहेत, गच्च हिरवाई पसरलीय, वारा तर हळूच  शिळ घालत साद घालतोय आणि धरती नव्या नवलाईने नटून लाजतेय. अगदी अस्साच भास होतोय ना! हेच पहायला मग संडे असो वा मंडे वार्‍याच्या सादेला प्रतिसाद द्यायला पाऊसवेडे बाहेर पडलेत. रिमझिमता पाऊस अनुभवायला ट्रेकर्स, यंगर्स अनेक फॅमिलीजनी डोंगर बूक केलीत. जलाशयाने ओथंबून वाहणारे धबधबे आरक्षित केलेत. निसर्ग मात्र इथे कोणाला मागे सर म्हणत नाही तोही कुशीत घेत मनसोक्‍त हिरवळत नाचतोय.

- प्रतिभा राजे