Fri, Jul 19, 2019 15:26होमपेज › Youthworld › ज्‍येष्‍ठा गौरी पार्वतीचं रुप ; गौरव स्‍त्रित्‍वाचा

ज्‍येष्‍ठा गौरी पार्वतीचं रुप ; गौरव स्‍त्रित्‍वाचा

Published On: Sep 15 2018 1:49AM | Last Updated: Sep 14 2018 3:54PMपुढारी ऑनलाईन : सीमा पाटील

महाराष्‍ट्रात गौरी-गणपतींचा सण मोठ्‍या उत्‍साहात सजरा केला जातो. गणपती उत्‍सवाला जोडूनच गौरीचा सण येतो. ज्येष्‍ठा गौरी म्‍हणजे माहेरवासिनींचा सत्‍कार. या सणानिमित्ताने माहेरवासिनींची माहेरपण जपता येतं. तिच्‍या आगमनासाठी संपूर्ण घर सज्‍ज होते व गौराईच्‍या आगमनामूळे घर गजबजून जातं. तिच्‍या आगमन पित्‍यार्थ पूजन करण्‍यात येते. माहेरवासिनीला काही कमी पडू नये म्‍हणून घरातील थोरांपासून लहानांपर्यंत सर्वजण धडपड करत असतात. आज गौरी आवाहन त्यानिमित्त...

रणुझणू त्‍या पाखरा
जा रे माझ्‍या माहेरा |
आली गौराई अंगणी 
तिला लिंबलोणी करा|

गणपतीच्‍या सणाला गौराई म्‍हणजे ‍या पार्वती माहेरपणासाठी येते. तिचं लिंबलोण करुन स्‍वागत केले जाते. घरी येणार्‍या पाहुणी माहेरवासीन असेल तर तिचं कौतूक, आदरातिथ्‍य काही वेगळंच असते. 

बंधु  येईल माहेरी न्‍यायला 
गौरी गणपतीच्‍या सणाला |

Related image

गौरी-गणपतीच्‍या सणासाठी बंधुराया माहेरवासिनीला घरी आणतो. त्‍यासाठी भाजी-भाखरीची शिदोरी दिली जाते. आता याची जागा गोड्‍याच्‍या पदार्थांनी घेतली आहे, पण उत्‍साह मात्र तोच आहे.  त्‍यानिमित्ताने मैत्रीणी भेटतात. गप्‍पागोष्‍टी होतात. सार्‍या मिळून गौराईचे खेळ खेळतात. प्रत्‍येकाच्‍या घरी आपापल्‍या कुलाचाराप्रमाणे गौरी आणल्‍या जातात. प्रत्‍येक भागात गौरी बसविण्‍याच्‍या आणि आगमनाच्‍या पद्धती वेगवेगळ्‍या आहेत. काहींच्‍या घरी उभ्‍या गौरी, मातीचे मुखवटे, तांब्‍याच्‍या धातुच्‍या गौरी तर काही घरात नदीतील पाच किंवा सात खडे आणून गौरी पूजन केले जाते तर काही घरात छोट्‍या झुडपाची गौर म्‍हणून पूजन केले जाते. 

Image result for गौरी गणपती

गणपती उत्‍सवाला भाद्रपद शुक्‍ल पक्षाच्‍या ज्‍येष्‍ठ नक्षत्रावर गौरीचे पूजन होते, म्‍हणून त्‍यांना ज्येष्‍ठा गौरी म्‍हणतात. आदल्‍या रात्री गौरी आणल्‍या जातात. दुसर्‍या दिवशी पूजा आणि तिसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. गौरी घरात आणताना मागे वळून न पाहण्‍याची पद्धत आहे. गौरीचे घरात आगमन होताना घरातील सुवासिनीने किंवा कुमारीकेने प्रथम दूध व पाणी पायावर घालून तिला हळद कुंकू लावून, अक्षता वाहून निरंजनाने औक्षण करण्‍यात येते. 

गौर आली गौर आली.. 
सोन्‍या मोत्‍याच्‍या पावलांनी 
सगळीकडे दृष्‍टी फिरव 
आनंदी आंनद कर

असे म्‍हणत गौरीला स्‍वयंपाक घरात दुधदुभत्‍याच्‍या ठिकाणी, धान्‍याच्‍या ठिकाणी असे सर्व घराच्‍या काना-कोपर्‍यातून फिरवले जाते. गौरीची म्‍हणजेच पार्वतीची कृपादृष्टी घरावर सदैव असावी. हाच यामागचा हेतू असतो. गौरीच्या आगामनासाठी अंगणात रांगोळीची आरास केली जाते. घरात गौरीच्या पाऊलाचे छाप उमटवले जातात. खड्याची गौर असेल तर ते खडे एखाद्या लहानशा वाटीत ठेवून पूजेच्या ठिकाणी ठेवले जातात. उभी मुखवट्याची गौर असेल तर वेगळी आरास केली जाते. त्यासाठी गौरी बसावायच्या जागी खास पायऱ्यांची आरास, पाठीमागे सोनेरी चक्र, फुलांच्या माळा, वेली सोडल्या जातात. गौरीच्या पुढे लाडू, चकली, पढे, मिळाई, असे वेगवेगळे खाद्य पदार्थ मांडले जातात. समोर एक दिवाही सतत तेवत ठेवला जातो. मुखववट्याच्या उभ्या गौरीला नवी साडी नेसवली जाते. बऱ्याच घरात दर वर्षी गौरीसाठी नवी साडी घेतली जाते. पुढे हिच साडी घरातल्या सासू-सुना प्रसाद म्हणून वापरतात.

Related image

 गौरीच्या सजावटीमध्ये कोल्हापूरी दागिन्यांचे महत्त्व वेगळेच आहे. कोल्हापूरी साज, डोरली, नथ, मंगळसुत्र, गौरीचा मुकुट, बांगडया, माळा, ठुसी, पुतळ्या, राणीहार, बाजुबंद, कंबरपट्टा, मेकला, कर्णफुले, आदी दागिनेही असतात. हे दागिने ल्यायलेली मोगऱ्याचा गजरा घातलेली गौराई बघून सगळ्यांचे हात आपोआप नमस्कारासाठी जुळतात. 

आणा गं हळदी-कुंकु, गौर माझी लूव द्या |
आणा गं धुपारत, गौर माझी धुपू द्या|
टाका गं बसकार, गौर माझी बसू द्या|
आणा गं भाजी-भाकरी, गौर माझी जेवू दे|

असे गौरीचे आवाहन केले जाते त्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवाला जातो. काही गावांमध्ये तांदाळाची भाकरी, शेपूची, मेथीची किंवा भोपळीची भाजी आणि तिच्या सयसोबत हिरवी मिरची याचा नैवेद्य केला जातो. जेवणासाठी सवाष्णही बोलावली जाते. सवाष्णीची खणानाराळाने ओटी भरली जाते. संध्याकाळी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम केला जातो. आजही गावात मोठ्या प्रमाणात गौरीचे खेळ खेळले जातात. गौरीच्या गाणी म्हंटली जातात. रात्रभर जागरण करून महिला झिम्म्याचा फेर धरतात.  फुगडी खेळतात, पिंगा घालतात, सूप-घागर नाचवतात. 

Image result for गौरी गणपती

गौरीचं आकर्षक रूप सर्व घराला मोहित करून टाकते. वातावरणात आनंद समाधान निर्माण करते. सर्वत्र गौरीचे आगमन वाचत गाजत केले जाते. काही गावात एखाद्या मोठ्या घरची मानाची गौर तिची आरास पहाण्यास स्त्रियांची मोठी गर्दी होते. काही ठिकाणी स्त्रिया घरोघरी जाऊन वाजत गाजत गौरीचे डहाळे देतात. त्यांचे पूजन केले जाते. हे डहाळे वेस ओलांडून आणले जातात. गौरीला पाहूणी म्हणून घरी आणंल जातं. काही घरातून सात खड्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. या मागे एक कथा आहे. 

Related image

फार वर्षापूर्वी सिंदुरपूर येथे नरांतक नावाचा राक्षस राज्य करत होता. नरांतक राक्षसाने २१ हजार स्त्रियांना बंदी केले होते. याचा गणपतीला राग आला. गणपती रिध्दी-सिध्दी आणि त्यांच्या आठ मैत्रिणी एकत्र जमल्या व सर्वांनी मिळून नरांतकाचा नाश करण्यासाठी स्त्रियांची सेना बनवली आणि गणपतीला सेनापती नेमून नरांतकावर हल्ला केला. नरांतक मारला गेला. आणि बंदीवान स्त्रियांची सुटका केली. या युद्धात सात स्त्रियांनी खूप मोलाची कामगिरी केली त्यांची आठवण म्हणून हे सात खडे पुजले जातात.

Image result for गौरी गणपती

गौरीच्या  तीन दिवसाच्या आगमनाच्या काळात गौरी विसर्जनाच्या आदल्या रात्री गौरीची ओटी भरली जाते. घरी आलेल्या सुवासिनीला पान-सुपारी, साखर-फुटाणे प्रसाद म्हणून दिले जातात. रात्रभर गौरीचे खेळ खेळले जातात. मध्यरात्री गौरीचे कान उघडले जातात. भावनेर वाजवला जातो. गौरीची गाणी म्हंटली जातात. आरती म्हटली जाते. तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी गौर-गणपतीचे एकत्र विसर्जन केले जाते. गौरी विसर्जनाच्या वेळी स्त्रिया ओढ्यातून, नदीतून वाळूचे खडे आणतात व आपापल्या घरावर फेकतात. त्याचा आवाज जितका जास्त तितके पिक पाणी चांगले असे मानले जाते. गौरीच्या विसर्जनानंतर घर रिकाम दिसतं. तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. हळू हळू माहेरवावसिनी सुद्धा आपल्या सासरी जातात आणि वाट पाहतात, ती पुढच्या वर्षीच्या गौरी गणपतीच्या सणाची.