Mon, Jun 17, 2019 11:16होमपेज › Vishwasanchar › गाडी भरून आणले पैसे; इमारतीवरून उधळले!

गाडी भरून आणले पैसे; इमारतीवरून उधळले!

Published On: Jan 11 2019 11:55PM | Last Updated: Jan 11 2019 10:48PM
हाँगकाँग 

श्रीमंत लोकांची दानशूर वृत्ती कौतुकाचा विषय बनत असते. अर्थात एखाद्याला मदत करण्याचीही विशिष्ट पद्धत असते. हाँगकाँगमधील एका बड्या बापाच्या पोराने लोकांना मदत करण्याचे ठरवले; पण त्यासाठी त्याने असा मार्ग अवलंबला ज्यामुळे त्याला पोलिसांकडून ‘चतुर्भुज’ व्हावे लागले! वोेेंग चिंग-किट नावाच्या या तरुणाने श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करीत हा ‘दानधर्मा’चा प्रकार केला. त्याने आपल्या महागड्या गाडीतून नोटांचे पुडके भरून आणले आणि या नोटा त्याने एका उंच इमारतीवरून रस्त्यावर भिरकावल्या! गरिबांची मदत करण्यासाठी म्हणून त्याने तब्बल 20 हजार पौंड म्हणजे सुमारे 18 लाख रुपयांच्या नोटा उधळल्या!

24 वर्षांच्या वोंगने केलेल्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. खरे तर त्याला गरिबांची कणव असण्यापेक्षा लोकांच्या नजरेत आपण ‘हीरो’ कसे ठरू, याची अधिक चिंता होती. त्याने नोटांचा पाऊस सुरू केल्यावर अर्थातच रस्त्यावरील लोकांनी त्या गोळा करण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ माजला. कुणी तरी याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी तत्काळ तिथे येऊन वोंगला अटक केली. वोंगने हा सर्व प्रकार फेसबुक लाईव्ह करूनही दाखवला होता. मला ‘रॉबिनहूड’ बनण्याची इच्छा होती, असे त्याने पोलिसांना सांगितले.