बीजिंग : गेल्या अनेक दशकांच्या काळात नवे अँटिबायोटिक आलेले नाही. सध्याच्या अनेक अँटिबायोटिकना जीवाणूंनी प्रतिरोधक क्षमता विकसित केली आहे. अशा स्थितीत आता चीनमधील संशोधकांच्या एका पथकाने नवे अँटिबायोटिक विकसित होईल, अशी सामग्री शोधली आहे. त्यांनी त्यासाठीचे उपयुक्त कवक शोधले आहे. ते प्रयोगशाळेतही विकसित करून त्यापासून अँटिबायोटिक औषध निर्माण केले जाऊ शकेल, असे त्यांना वाटते.
‘नेचर कम्युनिकेशन’ या नियतकालिकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सध्या जगभरातील आरोग्य संघटना याबाबतीत संशोधन करीत आहेत. जगात अँटिबायोटिकना दाद न देणारे अनेक सुपरबग निर्माण झाले आहेत. सुपरबग हे बॅक्टेरियाचे स्ट्रेन आहेत जे अनेक प्रकारच्या अँटिबायोटिकबाबत प्रतिरोधकता निर्माण करतात. चीनच्या चोंगकिंग विद्यापीठातील संशोधकांनी एल्बोमायसिन संश्लेषित करण्यासाठी एक नवे तंत्र शोधले आहे. एल्बोमायसिन हा कवकांचा एक समूह आहे. त्यामधील अँटिमायक्रोबियल (सुक्ष्म जीवरोधक) गुणांची यापूर्वीच पुष्टी झाली आहे.