Sat, Jul 04, 2020 11:11होमपेज › Vishwasanchar › नराशिवायच ‘या’ सर्पांची  मादी देते पिल्‍लांना जन्म

नराशिवायच ‘या’ सर्पांची  मादी देते पिल्‍लांना जन्म

Last Updated: Jul 01 2020 8:09AM
न्यूयॉर्क ः नर आणि मादीच्या मिलनाशिवायच काही प्रजातींमध्ये प्रजनन घडत असते. काही किटकांमध्ये नराच्या संपर्काशिवायच पिल्‍लांना जन्म देणार्‍या मादी असतात. अमेरिकेतील बोआ या अजगराच्या जातीच्या सापामध्येही अशी क्षमता असते. संशोधनात आढळले आहे की या प्रजातीच्या माद्यांनी नराशी संपर्क न येता पिल्‍लांना जन्म दिला. ही पिल्‍ली मादी जातीचीच असतात व त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची गुणसूत्रे असतात.

अशा काही प्रजाती स्वतःचेच क्लोन तयार करीत असतात. माणसामध्ये ‘एक्स’ आणि ‘वाय’ ही गुणसूत्रे असतात. पुरुषांमध्ये ‘एक्स-वाय’ तर स्त्रियांमध्ये ‘एक्स-एक्स’ अशी गुणसूत्रे असतात. स्त्रियांकडून ‘एक्स’ गुणसूत्रच अपत्यामध्ये येत असते तर पुरुषांमधील ‘एक्स’ गुणसूत्र आले तर मुलगी आणि ‘वाय’ गुणसूत्र आले तर मुलगा होत असतो. त्यामुळे मुलगा जन्मेल की मुलगी ही सर्वस्वी पुरुषावरच अवलंबून असते.

साप व अन्य काही सरीसृपांमध्ये याऐवजी झेड व डब्ल्यू ही गुणसूत्रे असतात. सर्व सापांमध्ये ‘झेड-झेड’ गुणसूत्रे नरामध्ये तर ‘झेड-डब्ल्यू’ गुणसूत्रे मादीमध्ये असतात. बोआ प्रजातीच्या माद्यांनी ज्या पिल्‍लांना जन्म दिला त्यांच्यामध्ये ‘डब्ल्यू-डब्ल्यू’ ही गुणसूत्रे आढळली. मादीचे नराशी मिलन होऊन त्यांचा जन्म झालेला नसल्याने त्यांच्यामध्ये अनिवार्यपणे सर्व अनुवंशिकता आपल्या आईकडूनच वारशाने मिळालेली होती. त्यावरून असे दिसून येते की ते आपल्या आईचेच अर्धे क्लोन आहेत.