Sun, May 31, 2020 10:30होमपेज › Vishwasanchar › दीपिकाचे (गुणी) बाळ!

दीपिकाचे (गुणी) बाळ!

Published On: Mar 15 2019 1:50AM | Last Updated: Mar 14 2019 8:08PM
मुंबई : नट्यांना ‘लग्‍न कधी होणार?’ असे आधी विचारून भंडावून सोडले जाते व लग्‍नानंतर ‘आई कधी होणार?’ असे विचारून वैताग आणला जातो. सध्या दीपिका पदुकोणबाबतही अशाच चर्चेने ऊत आणला. दोनच दिवसांपूर्वी सेलिब्रिटी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह रोमँटिक अंदाजात विमानतळावर दिसले होते. हे दोघे लंडनला दाखल झालेत. इथे त्यांनी एका मुलाला दत्तक घेतल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, त्यांनी मुलाला नव्हे तर एका मुलानेच त्यांना पालक म्हणून दत्तक घेतल्याचे समोर आले! हा मुलगा दुसरा-तिसरा कुणी नाही तर अभिनेता वरुण धवन आहे! वरुणने दीपिका आणि रणवीरला आपले ‘दत्तक पालक’ म्हणून संबोधले आहे.

वरुण धवनसोबत या दोघांचा एक सेल्फी व्हिडीओही समोर आला आहे. त्यामध्ये वरुण आपली दत्तक आई दीपिका आपली किती काळजी घेतेय हे सांगताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडीओ दीपिका, रणवीर आणि वरुणच्या चाहत्यांना भलताच आवडलेला आहे! कसेही, उभा-आडवा चित्रीत केलेला हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दीपिका-रणवीर सध्या लंडनमध्ये फिरत आहेत तर वरुण धवन आपला आगामी चित्रपट ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ची अपूर्ण राहिलेली शूटिंग पूर्ण करण्यासाठी लंडनमध्ये पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी वरुण ‘कलंक’च्या टीझर प्रदर्शनासाठी भारतात आला होता. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ताबडतोब तो लंडनला परत गेला.