वॉशिंग्टन : जीवनासाठी सूर्यप्रकाश किती महत्त्वाचा आहे, हे काही नव्याने सांगावयाची गरज नाही. किंबहुना हाच प्रकाश पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती होण्यास प्रमुख कारणही ठरला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यावर सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम होतो. आरोग्य आणि सूर्यप्रकाश यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘व्हिटॅमिन डी’. आरोग्यदायी जीवन आणि शरीरातील हाडे बळकट करण्यात ‘व्हिटॅमिन डी’चे योगदान महत्त्वाचे ठरते. मात्र, काचेच्या घरांमध्ये राहणार्या लोकांमध्ये व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असू शकते, असे या संशोधनात सिद्ध झाले आहे.
हाडांमध्ये ‘कॅल्सियम’च्या अवशोषणासाठी ‘व्हिटॅमिन डी’ ची आवश्यकता असते आणि याचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश होय. सूर्यप्रकाशात असलेल्या ‘अल्ट्रावॉयलेट’ किरणांचा वापर करून आपली त्वचा ‘व्हिटॅमिन डी’ची निर्मिती करते. तर मानवी शरीरातील लिवर व किडनी जैविक रूपाने निष्क्रिय झालेल्या ‘व्हिटॅमिन डी’ला पुन्हा सक्रिय करू शकतात. यामुळे तज्ज्ञांच्या मते रोज किमान 10 ते 15 मिनिटे तरी सूर्यप्रकाशात घालवावीत.
सूर्याची किरणे ही ‘युवीए’ आणि ‘युवीबी’ अशा दोन प्रकारची असतात. युवीए किरणे ही त्वचेच्या खोलपर्यंत जाऊन त्वचेवरच्या सुरकुत्यांचे कारण बनतात. तर युवीबी किरणे ही व्हिटॅमिन डीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करतात. मात्र, घराच्या खिडक्यांना असणार्या काचा या युवीबी रोखण्यात सक्षम असतात. अशा प्रकारच्या घरात बसणार्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन निर्मिती होऊ शकत नाही. यामुळेच काचेच्या घरात राहणार्या लोकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता जाणवू शकते. हे संशोधन अमेरिकेतील ‘बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन’ मध्ये करण्यात आले आहे.