Thu, May 23, 2019 22:27
    ब्रेकिंग    होमपेज › Vishwasanchar › अझीम प्रेमजींनी दान केले ५३ हजार कोटी!

अझीम प्रेमजींनी दान केले ५३ हजार कोटी!

Published On: Mar 15 2019 1:50AM | Last Updated: Mar 14 2019 8:19PM
नवी दिल्ली : ‘जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेंच करी’ असे आपल्या तुकोबांनी म्हटले आहे. साता समुद्रापार असलेल्या बिल गेट्स नावाच्या माणसाने याबाबतचा मोठा आदर्श जगासमोर ठेवला आणि अनेक उद्योजकांनी त्यांचा कित्ता गिरवला. वॉरेन बफेट, मार्क झुकेरबर्गसारख्या उद्योजकांपासून ऑप्रा विन्फ्रेसारख्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या संपत्तीचा मोठा भाग जगभरात विविध समाजकार्यासाठी उदार हस्ते दान केलेला आहे. यामध्ये आपल्या देशातील ज्येष्ठ उद्योगपती अझीम प्रेमजी यांचाही समावेश आहे. त्यांनी आपले 34 टक्के शेअर्स दान केले असून त्यांचे मूल्य 52,750 कोटी रुपये आहे. शिवाय आपली 50 टक्के संपत्ती दान करण्याचा मनोदयही बोलून दाखवलेला आहे.

प्रेमजी यांनी गरीब, वंचितांसाठी देण्यात येणार्‍या देणगीमध्ये आता अशी तब्बल 52,750 कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या एकूण देणगीची रक्‍कम 1 लाख 45 हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. समाजसेवेसाठी देण्यात येणार्‍या देणगीमध्ये त्यांनी आता बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे. आपली 50 टक्के संपत्ती दान करू, अशी घोषणा काही वर्षांपूर्वी अझीम प्रेमजी यांनी केली होती. त्यानुसार ‘विप्रो’च्या नफ्यातील मोठा वाटा ते अझीम प्रेमजी फाऊंडेशनला दान करतात. विप्रो लिमिटेडमधील त्यांच्या भागभांडवली मालकीतून येणार्‍या लाभातील 34 टक्के आर्थिक लाभ हे समाजसेवासाठी राखून ठेवण्याचा बुधवारी निर्णय जाहीर केला. अझीम प्रेमजी फाऊंडेशन मुख्यत: शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करते आणि या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अन्य ‘ना-नफा’ तत्त्वावरील संघटनेसाठी बहुवार्षिक वित्तीय अनुदान देते.