Wed, Jan 23, 2019 07:19होमपेज › Vishwasanchar › दुबईत दहा दिवसांचा दिवाळी उत्सव!

दुबईत दहा दिवसांचा दिवाळी उत्सव!

Published On: Nov 09 2018 9:26PM | Last Updated: Nov 09 2018 9:26PMदुबई ः संयुक्‍त अरब अमिरातमध्ये विशेषतः दुबईत यावर्षी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेथील सरकारनेही प्रथमच दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली. दुबई पोलिसांच्या बँडने भारताच्या राष्ट्रगीताची धून वाजवली. तेथील भारतीय लोकांसाठी हा क्षण अविस्मरणीय होता.

दुबई सरकार आणि भारतीय वकिलात दहा दिवसांची दिवाळी साजरी करीत आहे. त्यानिमित्त आधीच झगमगणारी दुबई आणि दिवाळीच्या प्रकाशाने अधिकच उजळून निघाली आहे. दुबईत 1 नोव्हेंबरला दिवाळीचा उत्सव सुरू झाला असून, तो 10 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसेच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांनी बुधवारी हिंदीत ट्विटर करून लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘सद्भावना आणि आशेचा प्रकाश आजीवन आमच्यासोबत राहो’ असे त्यांनी म्हटले. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाही दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघत आहे. दुबईच्या बॉलीवूड पार्कमध्ये कलाकार हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करीत असताना दिसून आले. यूएईमध्ये मोठ्या संख्येने भारतीय लोक राहतात. एका अनुमानानुसार तिथे सुमारे 25 लाख भारतीय असून ही संख्या एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे.