Thu, Jun 04, 2020 00:58होमपेज › Vidarbha › मॉब लिंचिंगच्या घटना आपल्या देशात घडत नाहीत : मोहन भागवत

मॉब लिंचिंगच्या घटना आपल्या देशात घडत नाहीत : मोहन भागवत

Published On: Oct 08 2019 10:26AM | Last Updated: Oct 08 2019 10:52AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत.नागपूर : पुढारी ऑनलाईन

लोकांच्या अपेक्षा प्रत्यक्षात साकारून देशहिताच्या दृष्टीकोनातून त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याचे सामर्थ्य मोदी सरकारमध्ये आहे आणि कलम ३७० हटवून सरकारने हे सिद्ध करुन दाखविले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगत मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

ते नागपूरमध्ये रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळ्यात बोलत होते. केंद्रात भाजप सरकार आल्याने देशात काही तरी व्हायला लागले आहे असा विश्वास लोकांना वाटू लागला. यामुळेच सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिले. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. २०१४ मध्ये ज्या सरकारला निवडून दिले; त्याच सरकारला २०१९ मध्ये निवडून दिले. जनतेने पून्हा भाजपवर विश्वास दाखवला, असेही ते म्हणाले.

जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा सरकारने निर्णय घेतला. यावरून धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये आहे. आमच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर चांद्रयान सोडले. अपेक्षेनुसार यात यश आले नसले तरी पहिल्याचा प्रयत्नात जगातील कुणालाही जे जमले नाही ते आपल्या शास्त्रज्ञांना करुन दाखविले, असे त्यांनी सांगितले.

मॉब लिंचिंगच्या घटना बाहेरच्या देशात घडतात, आपल्या देशात नाहीत. लिंचिंग हा शब्द बाहेरून आला आहे. आमच्याकडे लिंचिंग कधीच नव्हते, असा दावा त्यांनी बोलताना केला.

हिंदू समाज आणि हिंदूत्व याबद्दल अनेक विकृत आरोप करून बदनामी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. यामागे काही प्रवृत्ती असून ते स्वार्थासाठी हे सर्व करत आहेत, असेही भागवत यांनी नमूद केले. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह स्वयंसेवकाच्या गणवेषात उपस्थित राहिले.