Wed, Oct 16, 2019 11:00होमपेज › Vidarbha › अवनीला आधी गोळ्या घातल्या, नंतर डार्ट लावला

अवनीला आधी गोळ्या घातल्या, नंतर डार्ट लावला

Published On: Nov 07 2018 1:33AM | Last Updated: Nov 07 2018 1:14AMनागपूर : प्रतिनिधी

यवतमाळ  जिल्ह्यातील राळेगाव जंगलात  अवनीला शार्पशूटर असगर अली याने ठार करण्यापूर्वी तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलाच नाही, तर थेट गोळ्या घातल्याचे पुरावे आता पुढे आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. दोन वनअधिकार्‍यांच्या संभाषणाचा ऑडीओ व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण चांगलेच गंभीर झाले आहे. अवनीला गोळ्या घातल्यानंतर दोन वनाधिकार्‍यांमध्ये झालेल्या फोनवरील संभाषणातून अवनीला आधी गोळ्या घातल्या गेल्या आणि नंतर बेशुद्ध करण्याचा डार्ट तिच्या मृतदेहावर लावल्याची माहिती पुढे आली आहे. 

या ऑडिओ क्लिपमध्ये वेटरनरी डॉक्टर्सच्या हवाल्याने वनाधिकारी ही माहिती एकमेकांना देत आहेत. वन विभागाकडून अवनी वाघिणीने वन विभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्याने तिला गोळ्या घातल्याचे सांगितले जात होते. यवतमाळच्या राळेगावच्या जंगलात ‘अवनी टी वन’ वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने गोळ्या घातल्या होत्या. हे संभाषण वनाधिकार्‍यांमध्ये झाले आहे. यात स्पष्टपणे वाघिणीला थेट गोळ्या घातल्याचे हे अधिकारी सांगताहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणार्‍या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनाबद्धरीत्या तिचा केलेला खून आहे असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे.

वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही. कोट्यवधी रुपये वाया गेले असाही आरोप वन्यप्रेमींनी केला आहे. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फॉरेंसिक अहवालसुद्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.

दरम्यान, अवनी तर गेली आता तिच्या दोन बछड्यांचे काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. मानव आणि वन्यजीव संघर्षातून वाघिणील जीव गमवाला लागला असल्याचं वन्यजीव प्रेमींनी म्हटलंय.