Sun, Aug 18, 2019 06:49होमपेज › Vidarbha › आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना : राज्यपाल सी. विद्यासागर राव

आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना : राज्यपाल सी. विद्यासागर राव

Published On: Feb 06 2019 11:30AM | Last Updated: Feb 06 2019 11:30AM
नागपूर : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे. कारण या संघटनेने प्रत्येक व्यक्तीचे मत आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांचा नेहमी सन्मान केला, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्‍त केले आहे. 

रामटेक येथील कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठमध्ये आरएसएसचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरूजींच्या नावावर शैक्षणिक संकुल आणि गुरूकुलमचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यासागर राव बोलत होते.  

विद्यासागर राव म्हणाले, की संघाच्या रूपाने डॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आरएसएसच्या जगभरता शाखा आहेत.  महात्‍मा गांधी यांच्या हत्‍येनंतर संघासमोर सर्वांत मोठे आव्हान उभे राहिले होते.  तत्‍कालीन सरकारने ४ फेब्रुवारी १९४८ रोजी संघावर बंदी घातली होती. त्‍यानंतर गोळवलकर गुरूजींनी सरकारला संघावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. तसेच संघावर घातलेली बंदी हटवण्याची मागणी केली. त्‍यांच्या प्रयत्‍नानंतर १२ जुलै १९४९ रोजी संघावर घातलेली बंदी मागे घेतली.