Wed, Jun 19, 2019 08:14होमपेज › Vidarbha › ‘ब्राह्मोस’ची माहिती पाकच्या हाती; आयएसआय एजंटला नागपुरातून अटक

‘ब्राह्मोस’ची माहिती पाकच्या हाती; आयएसआय एजंटला नागपुरातून अटक

Published On: Oct 08 2018 3:27PM | Last Updated: Oct 09 2018 1:59AMनागपूर / नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा / पीटीआय

नागपूरच्या ब्राह्मोस एअरोस्पेसमध्ये अभियंता असलेल्या पाकिस्तानच्या आयएसआय एजन्सीच्या कथित एजंटला सोमवारी सकाळी नागपुरात त्याच्या उज्ज्वलनगर येथील राहत्या घरी अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने ही कारवाई केली असून, निशांत अग्रवाल असे अटक केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

निशांत सिस्टीम इंजिनीअर असून, ब्राह्मोस क्षेपणास्त्र युनिटमध्ये गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहे. सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दिल्याचा निशांतवर आरोप आहे. निशांतवर रविवारी रात्रीपासून पाळत ठेवण्यात आली होती.

निशांत भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि डीआरडीओशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला देत असल्याची माहिती उघड झाली आहे. निशांत उत्तराखंडचा रहिवासी आहे आणि गेल्या चार वर्षांपासून तो डीआरडीओच्या नागपूरच्या युनिटमध्ये कार्यरत आहे.

कथित आयएसआय एजंटवरील कारवाईचे वृत्त नागपुरात पसरताच, एकच खळबळ उडाली. यासंदर्भात नागपूरचे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषण कुमार  उपाध्याय म्हणाले की, उत्तर प्रदेश एटीएस व सैन्यदलाच्या गुप्तचर यंत्रणेने ही कारवाई केली आहे. आमच्याकडे जी मदत मागितली होती, ती त्यांना पुरवली. 

ब्राह्मोस हे संरक्षण मंत्रालयाचे संशोधन विभाग असलेल्या डीआरडीओचे संशोधन असून, रशियाच्या मदतीने हे क्षेपणास्त्र विकसित  करण्यात आले आहे. या निर्मितीसाठी संरक्षण मंत्रालयाने ब्राह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली असून, तिचे कामकाज नागपूरनजीकच्या एमआयडीसीतील बोरखेडी येथे सुरू आहे.    

निशांतच्या संगणकात संवेदनशील माहिती

उत्तर प्रदेश एटीएस प्रमुख असिम अरुण म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या अग्रवालच्या संगणकामधून अतिशय संवेदनशील माहिती मिळाली आहे. तो पाकिस्तानातील फेसबुक आयडीज्सोबत चॅटिंग करीत असल्याचेही समोर आले आहे.निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होता, नागपूर येथे येण्यापूर्वी तो हैदराबाद येथे कार्यरत होता. त्याने हरियाणातील कुरूक्षेत्र येथील एनआयटीमधून शिक्षण घेतले आहे.

हनी ट्रॅप लावल्याचा संशय 

पाकसह अन्य देशांच्या गुप्तचर संस्थांनी हनी ट्रॅपच्या माध्यमातून अग्रवाल याला जाळ्यात ओढल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मुली पुरवून त्याच्याकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मितीबाबतची गोपनीय माहिती आयएसआयने मिळविली असण्याची शक्यता आहे. सीआयए या अमेरिकन गुप्तचर संस्थेची महिला हेर त्याच्या संपर्कात असल्याचेही तपासातून पुढे आले आहे. ब्राह्मोसशिवाय आणखी काही माहिती लीक केल्याचा त्याच्यावर संशय असून, तपास यंत्रणा त्याची कसून चौकशी करीत आहेत.

अमेरिकन महिला हेराच्या संपर्कात होता

हायड्रोलिक्स-न्यूमेटिक्स वॉरहेड इंटिग्रेशन (प्रॉडक्शन डिपार्टमेंट) या विभागात तो वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. 40 कर्मचार्‍यांची टीम तो सांभाळत होता. नागपूरसह पिलानी साईट्सचे कामकाजही तो पहात होता. अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएच्या दिल्लीतील महिला हेराच्या संपर्कात तो होता.

ब्राह्मोस भेदते 300 कि.मी.वरील अचूक लक्ष्य

जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही ठिकाणाहून ब्राह्मोस क्षेपणास्त्र लाँच करता येते. साधारण ताशी 3700 कि.मी.च्या वेगाने 300 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. कमी उंचीवरून उड्डाण करता येत असल्याने ब्राह्मोस रडारच्या नियंत्रणात येत नाही. भारत आणि रशियाच्या वतीने हे क्षेपणास्त्र संयुक्‍तपणे निर्माण केले जाते. 

संरक्षण मंत्रालय म्हणते, निशांत डीआरडीओचा अभियंता नाही 

निशांत अग्रवाल हा मूळचा उत्तराखंडच्या रुरकीचा आहे. निशांत मेकॅनिकल इंजिनिअर असून, डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे, असे वृत्त प्रसिद्धी माध्यमांनी दिले होते. मात्र, तो डीआरडीओच्या नोकरीत नसल्याचा खुलासा संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी बी. बी. पांडे यांनी केला आहे. बोरखेडी येथील ब्राह्मोसच्या युनिटमध्ये निशांत कार्यरत आहे. नागपूरच्या उज्ज्वलनगर परिसरातील मनोहर काळे यांच्या घरात निशांत गेल्या चार वर्षांपासून राहत आहे. यावर्षी मार्च महिन्यात निशांतचा विवाह झाला आहे. 2017-18 मध्ये निशांतला सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्काराने गौरविण्यातही आले होते, अशी माहिती मिळाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो गोपनीय माहिती पुरवित असल्याचा संशय आहे. सोशल मीडियाद्वारे कोडवर्ड, इनक्रिप्टेड आणि गेम चॅटिंगद्वारे सांकेतिक संदेशाची देवाणघेवाण निशांत करीत असल्याचा सुगावा तपास यंत्रणांना लागला होता. आयएसआयसह सीआयएच्या महिला हेरांना तो ही माहिती पुरवित असल्याचे तपासातून पुढे आले आहे.