Sun, May 31, 2020 21:49होमपेज › Vidarbha › उन्हामुळे लाही लाही! नागपूरचा पारा उच्चांकी ४६.५ अंशांवर

उन्हामुळे लाही लाही! नागपूरचा पारा उच्चांकी ४६.५ अंशांवर

Last Updated: May 23 2020 7:56PM

file photoनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

विदर्भातील नागपुरात शनिवारी ४६.५ एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हासमोर कुलरही काम करीत नसल्याचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे.

शुक्रवारी (दि. २३ मे) विदर्भात उन्हाची तीव्रता तुलनेत अधिक होती. सोमवार २५ पासून नवतपा सुरू होत असल्याने उन चांगलेच तापणार आहे. संपूर्ण मोसमात पावसामुळे राहून गेलेला अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याच्या मूडमध्ये ऊन आहे.    नागपूरचा पारा सतत चढता आहे. शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सियसची नोंद केल्यानंतर शनिवारी २३ मे रोजी नागपुरचे कमाल तापमान ४६.५ अंश सेल्सियस होते. ही या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

पाठोपाठ अकोला येथे ४६.० अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. विदर्भात इतर ठिकाणी अमरावती व चंद्रपूर ४५.६, वर्धा ४५.५, गोंदिया ४५.४, यवतमाळ ४५.२, ब्रम्हपुरी ४४.१, गडचिरोली ४४.० आणि बुलढाणा येथे ४३.० अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.