Mon, Dec 17, 2018 04:35होमपेज › Vidarbha › घराणेशाहीपासून मी, फडणवीस दूर : गडकरी

घराणेशाहीपासून मी, फडणवीस दूर : गडकरी

Published On: Oct 09 2018 1:18AM | Last Updated: Oct 09 2018 1:18AMनागपूर : प्रतिनिधी

आपण आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले. एकदा निवडून आले की, बहुतेक जण समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरू होते, असे गडकरी म्हणाले.

घराणेशाहीपासून मी आणि मुख्यमंत्री दूर आहोत. कारण त्यांची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात येण्यास इच्छुक नाही, असे गडकरींनी नमूद केले. 

मुख्यमंत्र्यांचे वडील राजकारणात होते. मात्र, त्यांनी मुलाला राजकारणात आणले नाही. तर आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करून देवेंद्र यांना राजकारणात आणले, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांच्या नेतृत्वात मी काम केले आहे. त्यांच्या आई-वडिलांनी मला सांगितले नव्हते की, माझ्या मुलाला तिकीट द्या. त्यांच्या घरी मी कार्यकर्त्यांसह गेलो होतो. मी त्यांना सांगितले की, देवेंद्र यांना महापालिकेचे तिकीट द्यायचे आहे. ते म्हणाले मला काही अडचण नाही, पण त्यांच्या आईला आणि स्वत: देवेंद्रला विचारा. त्यांची तयारी असेल तर त्यांनी जावे.  त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वडील आमदार होते म्हणून तिकीट मिळाले नाही. तर जनता, कार्यकर्ते आणि पक्ष त्यांच्या घरी गेले आणि देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणले.