Fri, Sep 20, 2019 21:57होमपेज › Vidarbha › शिवस्मारकावरून विधानसभेत रणकंदन; भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी

शिवस्मारकावरून विधानसभेत रणकंदन; भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी

Published On: Jul 17 2018 3:06PM | Last Updated: Jul 17 2018 3:05PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली असताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी आक्षेपहार्य विधान केल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचा आरोप करीत प्रचंड गदारोळ केला. या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे, विजय भांबळे आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजदंड पळविला. त्यातच शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम यांनी शिवाजी महाराजांचा विषय सुरू असताना अतुल भातखळकर यांनी त्याला 'भलता' विषय संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप करीत याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्राची हातजोडून माफी मागावी अशी मागणी केली. शिवसेनेच्या या मागणीमुळे संतप्त झालेले भाजप आमदार योगेश सागर हे अनिल कदम यांच्या दिशेने धावले. त्यांना शिवसेना मंत्री रविंद्र वायकर यांनी रोखले. मात्र यानंतर झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज वारंवार तहकूब करण्यात आले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना अरबी समुद्रातील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप केला. त्यावर अतुल भातखळकर यांनी हरकत घेत मूळ मुद्द्यांवर चर्चा न करता पृथ्वीराज चव्हाण हे भलताच विषय काढत आहेत असे वक्तव्य केले. त्यावर आक्षेप घेत भातखळकर यांचे हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील यांनी केला. त्यानंतर आक्रमक झालेले काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जय शिवाजी...जय भवानी, शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत अध्यक्षांच्या असनावर चढले. त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी राजदंड उचलला तर तो विजय विजय भांबळे आणि अब्दुल सत्तार यांनी पळविला. 

भातखळकर यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही बोललो नाही तर मी भलताच हा शब्द पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल वापरल्याचे सांगितले. तसेच सभागृहाचा गैरसमज झाला असेल तर माफी मागितली. मात्र त्यांच्या निलंबनासाठी विरोधकांचा गदारोळ सुरू होता व कामकाज बंद पडत होते. अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी भातखळकर यांना सभागृहात शब्द जपून वापरण्याची समज देत वादावर पडदा टाकला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर...

विरोधकांच्या या गदारोळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांनी पंधरा वर्षे सत्तेत असून काहीही केले नाही. आपण स्मारकासाठी सर्व परवानग्या आणल्या. केवळ राजकारण करणार असाल तर मी उत्तर द्यायला सक्षम आहे, असा इशारा दिला.

अरबी समुद्रातील स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली नाही. मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे करण्यात येणाऱ्या स्मारकात जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल तेवढा राज्य शासन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्प चित्र पाठविण्यात आले होते तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचे डिजाईन करताना समुद्रातील वारे, लाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. समुद्रात हवेचा दाब सहन करून पुतळा असावा अशा पद्धतीने त्याचा आराखडा केला आहे