Mon, Jul 13, 2020 11:41होमपेज › Vidarbha › विदर्भात भाजपचे वर्चस्व

विदर्भात भाजपचे वर्चस्व

Published On: Oct 05 2019 8:39PM | Last Updated: Oct 05 2019 8:39PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविदर्भ वार्तापत्र : संजय पाखोडे

पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी सेना-भाजपमध्ये केलेला प्रवेश, विदर्भातून हद्दपार होण्याच्या स्थितीत असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष आणि 62 पैकी 44 जागा जिंकून नंबर वन वर असलेली भाजप, या परिस्थितीत 2019 ची निवडणूक भाजप-सेनेकरिता एकतर्फीच होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विद्यमान सरकारचे सहा मंत्री त्यांच्या मतदार संघात निवडणूक रिंगणात आहेत. भाजपची शिवसेनेशी युती झाल्यानंतर विदर्भातील 62 विधानसभा मतदार संघात दोन्ही पक्षाची उमेदवार निश्‍चिती झाली. ‘एमआयएम’नेसुद्धा अमरावती, अकोला, नागपूर येथे विधानसभानिहाय उमेदवार घोषित केले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडेही तिकिटोच्छुक उमेदवारांची गर्दी होती.वंचितनेही त्यांचे बाळापूरचे विद्यमान आमदार बळीराम शिरस्कार यांचे तिकीट कापले. विदर्भात राळेगावमध्ये आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके, जळगाव जामोद येथे कामगार मंत्री डॉ. संजय कुटे, मोर्शी मध्ये कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, यवतमाळचे राज्यमंत्री मदन येरावार आणि शिवसेनेचे दिग्रसचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकरिता ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कामठी मतदार संघात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पक्षाने तिकीट कापले. निवडणुकीत विजयी झाल्यास पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागण्याच्या आशेने हे सर्व मंत्री आपापल्या मतदार संघात सक्रिय झाले आहेत.

विदर्भाव्यतिरिक्‍त उर्वरित महाराष्ट्रातून ज्या गतीने अन्य पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे, त्या पार्श्‍वभूमीवर विदर्भात मात्र भाजप-सेनेकडे येण्याची अन्य पक्षातील नेत्यांची मानसिकता नव्हती. याउलट भाजपचे खासदार राहिलेले नाना पटोले आणि आमदार राहिलेले आशिष देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. नाना पटोले पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये गेले आणि साकोली विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवित आहेत. आशिष देशमुख हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. विदर्भातील 62 विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसदचे मनोहर नाईक हे एकमेव आमदार आहेत. त्यांच्या जागी आता राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक हे निवडणूक लढणार आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, वीरेंद्र जगताप, अमर काळे, रणजित कांबळे, सुनील केदार, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, अमित झनक या काँग्रेसच्या आमदारांवर विदर्भात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. गोंदियाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल भाजपमध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढवित आहेत. 

या व्यतिरिक्‍त प्रहारचे फायर ब्रँड नेते बच्चू कडू (अचलपूर) युवा स्वाभिमानचे रवी राणा (बडनेरा) या अपक्ष आमदारांचे आव्हान भाजपला आहे. आमदार रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावती लोकसभेत विजयी झाल्या आहेत. त्यामुळे किमान अमरावती मतदार संघात तरी राणा दाम्पत्याचा राजकीय प्रभाव वाढला आहे.

तीन आमदारांचे तिकीट कापले

विधानसभा निवडणुकीकरिता भाजपने पश्‍चिम विदर्भात तीन आमदार वगळता उर्वरित सर्व मतदार संघात विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील आठही मतदार संघापैकी भाजपच्या डॉ. अनिल बोंडे, डॉ. सुनील देशमुख, रमेश बुंदेले या विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. मेळघाट मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार प्रभूदास भिलावेकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. येथे सनदी अधिकारी असलेले रमेश मावस्कर यांना पक्षाने उमेदवारी दिली. 

यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, राज्यमंत्री मदन येरावार, संजीव रेड्डी-बोदकूरवार या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. उमरखेडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट पक्षाने कापले. या ठिकाणी नामदेव ससाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम यांच्याऐवजी संदीप धुर्वे यांना तिकीट देण्यात आले आहे. संदीप धुर्वे यापूर्वीही भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. 

अकोला जिल्ह्यात भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, रणजित सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात कामगारमंत्री डॉ. संजय कुटे, चैनसुख संचेती, आकाश फुंडकर या विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. तर चिखली मतदार संघातून अ‍ॅड. श्‍वेता महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वाशिममध्ये आमदार राजेंद्र पाटणी, लखन राज या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 

शिवसेनेने मेहकरमधून आमदार संजय रायमुलकर, दिग्रसमध्ये राज्यमंत्री संजय राठोड या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.