होमपेज › Vidarbha › दारू पाजून चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

दारू पाजून चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

Published On: Feb 02 2019 3:51PM | Last Updated: Feb 02 2019 3:51PM
चंद्रपूर : प्रतिनिधी 

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात चार वर्षीय चिमुरडीला दारू पाजून ३५ वर्षीय विकृताने लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. अनिल आडे ( वय 35) असे आरोपीचे नाव असून, तो नागरी येथील आहे. 

मुलीचे आई-वडील शेतात गेल्याची संधी साधून आरोपीने मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरी बोलावले. त्यानंतर तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला. मुलीचे आई-वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलगी रडताना दिसली. आईने तिला जवळ घेताच तिच्या तोंडातून दारूचा वास आला. त्यानंतर ही घटना उजेडात आली. आई -वडिलांनी तत्काळ वरोरा पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानंतर वरोरा पोलिसांनी आरोपीला अटक केली. 

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय फसला आहे. पूवीपेक्षा जास्त दारूचा महापूर वाहत असल्याने अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी ब्रम्हपुरीमध्ये ठाणेदार चिडे यांना दारू तस्करांनी चिरडल्यानंतर या अवैध दारू तस्करांवर पोलिस कारवाई करतील अशी भाबडी आशा समान्य नागरिकांची होती. मात्र नागरिकांची निराशा झाली. त्यानंतर गोवंश तस्करांनी पोलिस हवालदार मेश्राम यांना चिरडले. यानंतरही पोलिसांना जाग आली नाही. त्यातच आजच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे  वातावरण आहे.

दरम्यान, या घटनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून, चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत  न्यायालयात हजर केले असता, त्‍याला  15 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.