Mon, Sep 16, 2019 12:27होमपेज › Vidarbha › जाधव-शिंगणे यांच्यात चुरस

जाधव-शिंगणे यांच्यात चुरस

Published On: Mar 27 2019 1:59AM | Last Updated: Mar 29 2019 1:40AM
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमारेषेवर असलेला बुलडाणा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेकडे आहे; तर काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेने या मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी दिली आहे; तर राष्ट्रवादी काँगे्रसने यावेळी सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि माजी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या दोन पक्षांतच सरळ लढत आज तरी स्पष्ट दिसते आहे. 

बुलडाणा मतदारसंघात सुरुवातीपासूनच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. जुन्या जनसंघाच्या काळातही या मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक जाळे अगदी खोलपर्यंत रुजलेले होते. आजही इथे भाजपचाच जोर आहे. मात्र 1989 मध्ये शिवसेना-भाजपची युती झाल्यावर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याने तेव्हापासून इथे शिवसेनेचा खासदार निवडून येतो. सुरुवातीला हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे शिवसेनेचे मुंबईहून आयात केेलेले आनंद अडसूळ हे या मतदारसंघातून निवडून येत होते. 2009 मध्ये अडसुळांची रवानगी अमरावतीत झाली आणि खुल्या प्रवर्गात आलेल्या या मतदारसंघातून मेहकरचे शिवसेना आमदार प्रतापराव जाधव हे खासदार म्हणून 2009 आणि 2014 मध्ये दिल्लीला गेले. 

2014 मध्ये प्रतापरावांना 5,09,145 इतकी मते मिळाली होती. त्यावेळी त्यांची लढत काँगे्रसचे कृष्णराव इंगळे यांच्याशी होती आणि इंगळेंना 3,49,566 इतकी मते मिळाली होती. यावेळी ही जागा राष्ट्रवादी काँगे्रसकडे आली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे घोषित उमेदवार हे या परिसरात सहकार क्षेत्रातील एक वजनदार व्यक्‍तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील स्व. भास्करराव शिंगणे यांचेही या क्षेत्रातील सहकार चळवळीवर चांगलेच वर्चस्व होते. तेच वर्चस्व डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राखले आहे. त्यांचा सर्वांना घेऊन चालण्याचा स्वभाव लक्षात घेता त्यांचे सर्वच पक्षांत चांगले संबंध आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघात त्यांचे चांगले नेटवर्क आहे.  

प्रतापराव जाधव यांना शिवसेनेने तिसर्‍यांदा खासदार बनवण्यासाठी संधी दिली असली तरी स्थानिक शिवसैनिकांचा त्यांना बराच विरोध आहे. त्यांना मतदारसंघातून स्वकीयांचाच खूप विरोध असल्याचे बोलले जाते. त्यांना परत उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी पक्षातील अनेक दिग्गजांनी मुंबईत ‘मातोश्री’वर चांगलीच फिल्डिंग लावली होती. मात्र ‘मातोश्री’ने या फिल्डिंगला दाद दिली नाही. परिणामी स्वपक्षातीलच अनेक दिग्गज प्रचारादरम्यान निष्क्रियही राहू शकतात अशी भीती व्यक्‍त होत आहे. प्रतापरावांना  स्वपक्षासोबतच मित्रपक्षाचाही बराच विरोध आहे. परिणामी भाजपतून ध्रुपदराव सावळे किंवा सतीश गुप्ता हे बंडखोरीही करू शकतील, अशी शक्यता व्यक्‍त होत आहे. 

या मतदारसंघातून अद्याप बसपाचा कोण उमेदवार ते ठरलेले नाही. इथे मुस्लिम मतदारांचे बरेच वर्चस्व आहे. ही बाब लक्षात घेता 2014 मध्ये बसपाने इथे मुस्लिम उमेदवारच रिंगणात उतरवला होता.  याशिवाय इथे आंबेडकरवादी पक्षांचेही बर्‍यापैकी प्राबल्य आहे. वंचित बहुजन आघाडीही इथे एखादा उमेदवार रिंगणात उतरवू शकते. हे उमेदवार रिंगणात आले तर विजयी उमेदवाराच्या मताधिक्यावर निश्‍चितच परिणाम होऊ शकतो. 

2014 मध्ये या मतदारसंघात 15,90,392 इतके मतदार होते. अंतिम यादी अजून जाहीर झाली नसली तरी इथे सुमारे दीड लाख नवे मतदार नोंदले गेले असल्याचा अंदाज व्यक्‍त होत आहे. हे नवमतदार आणि त्यातीलही तरुण मतदार कोणाच्या बाजूने झुकतात त्यावर इथले यशापयश ठरणार आहे.