चंद्रपूर : प्रतिनिधी
काश्मीरसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे भारतापासून काश्मीर वेगळे करण्याचा पाकिस्तानचा डाव हाणून पाडला गेला आहे, असे ते म्हणाले. चंद्रपूर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय राष्ट्रहिताचा असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आम्ही प्रारंभापासून 370 कलमाच्या विरोधात होतो. 'जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वह काश्मीर हमारा है', अशा घोषणा आम्ही राजकारणात आल्यापासून देत होतो. या गोष्टीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वप्नपूर्ती केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच जम्मू-काश्मीरचे द्विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले आहेत.