होमपेज › Vidarbha › विदर्भातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा आलिशान बंगला अखेर केला जमीनदोस्त (video)

विदर्भातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा आलिशान बंगला अखेर केला जमीनदोस्त (video)

Last Updated: Feb 29 2020 1:59AM
नागपूर : विशेष प्रतिनिधी

नागपुरातील कुख्यात गुंड आणि स्वतःला स्वयंघोषित डॉन म्हणवून घेणार्‍या गँगस्टर संतोष आंबेकरच्या अलिशान बंगल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा चालविला आहे. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे नागपुर महापालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतरची ही सर्वात मोठी धाडसी कारवाई मानली जात आहे. नागपूर पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली आहे. 

ऑक्टोबर महिन्यापासून पोलिसांनी आंबेकर टोळी विरोधात कारवाई सुरू होती. तेव्हापासूनच आंबेकरच्या कटकारस्थानाचे केंद्र हा बंगला पोलिसांकडून पाडला जाईल अशी शक्यता होती. मात्र, महापालिकेकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते. पोलिस उपायुक्त राजमाने आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणी खास भूमिका वठविली आहे. बंगला पाडताना मोठा पोलीस फौजफाटा ही तैनात करण्यात आला होता. 

नागपुरातील इतवारी परिसरात संतोष आंबेकर याचा प्रशस्त आणि जयपुरी दगडाने सजवलेला कोट्यवधींचा बंगला आहे. त्याने अनेक गुन्हे याच ठिकाणी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुकाराम मुंढे यांनी गेले अनेक आठवडे थंडबस्त्यात असलेली ही कारवाई लगेच करण्याचे आदेश दिले आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. 

बंगला संपुर्ण पणे जमिनदोस्त करण्यास आणखी तीन दिवस लागतील असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नागपूरच्या इतवारी परिसरातला हा बंगला नुसता अनधिकृत नाही तर गेले दोन दशके नागपूरात दहशतीचा केंद्रबिंदू बनला होता. १२ ऑक्टोबर २०१९ रोजी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे संतोष आंबेकरला अटक करीत त्याच्या विरोधात ठोस कारवाई सुरू केली. 

त्यानंतर संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळी विरोधात एका नंतर एक गंभीर तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या होत्या. यामध्ये धमकावणे, खंडणी मागणे, मारहाण करणे, बलात्कार करणे, अवैध सावकारी करणे, नोटा बदलून देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांची फसवणूक करणे असे अनेक गुन्हे संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळी यांच्या विरोधात नागपुरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.