Mon, Sep 16, 2019 06:02होमपेज › Vidarbha › अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी व्हावा : देवेंद्र फडणवीस 

अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी व्हावा : देवेंद्र फडणवीस 

Published On: Jul 15 2018 1:39AM | Last Updated: Jul 15 2018 1:38AMनागपूर : प्रतिनिधी

संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. याचा उपयोग समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे. या अधिकाराचा वापर करताना विघातक विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची दक्षता प्रत्येक व्यक्‍तीने घेतली पाहिजे. जे सत्य आहे ते समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग यांच्या वतीने ‘फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले, अफवा पसरविण्यार्‍या बातम्यांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते. प्रसंगी दोन समाज परस्परांच्या विरोधात समोरासमोर येतात. यामधून दंगलीही घडल्या आहेत. सत्य समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अफवांना आळा घालण्यासाठी आज समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये जसा इंटरनेटचा वापर वाढला आहे, तसा लोकांना अभिव्यक्‍त होण्यासाठी माध्यमे मिळाली आहेत. त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्‍तीच्या मनातील आशा, आकांक्षा अभिव्यक्‍त होऊ लागल्या आहेत. पूर्वी माध्यमे नसल्यामुळे थेट अभिव्यक्त व्हावे लागत होते. त्यामुळे संवाद हा समोरासमोर व्हायचा. या संवादामुळे पुष्कळदा लोकांची मानसिकता संवाद करायची नसायची. मात्र, विविध संवाद समाजमाध्यमे उपलब्ध झाल्यामुळे लोक व्यक्‍त होऊ लागले आहेत. त्यामुळे अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा पूरेपुर उपयोग प्रत्येक जण घेऊ लागला आहे. मनातील गोष्ट दडवून न ठेवता कोणत्यातरी समाज माध्यमातून व्यक्‍त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.