होमपेज › Vidarbha › अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य

अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य

Published On: Sep 03 2018 10:02PM | Last Updated: Sep 03 2018 10:02PM



नागपूर : प्रतिनिधी 

अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये आज, रविवार (दि.३ सष्टेंबर) फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल झाल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धनराज सुरोसे असे अनैसर्गिक कृत्य करणार्‍या नराधम कैद्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित २५ वर्षीय कैदी हा गेल्या ५ वर्षापासून अमरावती जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या काळात त्याची ओळख धनराज सुरोसे याच्यासोबत झाली. त्यानंतर पीडित कैदी धनराज सुरोसे याला आजोबा म्हणून हाक देऊ लागला. एक दिवस रात्री धनराज सुरोसे याने पीडित कैदी झोपल्यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. धनराजचा त्रास असह्य झाल्याने पीडित कैद्याने यासंबंधीची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली. 

त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सदर पीडित कैद्याचा जबाब नोंदविण्यात आला. जबाब नोंदविल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी आज, रविवारी फ्रेजरपुरा पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी धनराज सुरोसे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.